कोलकाता : पाकिस्तानचावन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास पराभवाने संपला. इंग्लंडविरुद्धच्या साखळी सामन्यातील शेवटच्या लढतीत पाकिस्तानने शरणागती पत्करली. इंग्लंडने या विजयासह २०२५ मध्ये पाकिस्तानात होणा-या चॅम्पियन्स ट्रॉफीतील जागा पक्की केली. गतविजेत्या इंग्लंडची स्पर्धेतील सुरुवात पाहता त्यांचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील स्थान धोक्यात आले होते. वर्ल्ड कपमध्ये अव्वल ८ संघांनाच ही स्पर्धा खेळता येणार आहे आणि आजच्या विजयासह इंग्लंडने ७ व्या स्थानासह निरोप घेतला.
उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी पाकिस्तानला ४० चेंडूंत हे लक्ष्य पार करणे आवश्यक होते, पण ते अशक्य होते आणि त्यांचे आव्हान संपुष्टात आणले. अब्दुल्लाह शफिक ( ०) व फखर जमान ( १) हे अपयशी ठरले. कर्णधार बाबर आजमने ३८ धावा केल्या. मोहम्मद रिझवान ३६ धावांवर त्रिफळाचीत झाला. पाठोपाठ सौद शकीलही ( २९) बाद झाल्याने पाकिस्तानचा निम्मा संघ २७.५ षटकांत १२६ धावांत माघारी परतला. हॅरिस रौफ आणि मोहम्मद वसीम ज्युनियर यांनी दहाव्या विकेटसाठी ३५ चेंडूंत ५३ धावांची भागीदारी केली. रौफ ३५ धावांत बाद झाल्याने पाकिस्तानचा संपूर्ण संघ ४३.३ षटकांत २४४ धावांवर माघारी परतला. इंग्लंडने ९३ धावांनी सामना जिंकला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीला येताना इंग्लंडच्या डेवीड मलान ( ३१) व जॉनी बेअरस्टो ( ५९) यांनी ८२ धावांची भागीदारी केली. जो रूट व बेन स्टोक्स यांनी तिस-या विकेटसाठी १३१ चेंडूंत १३२ धावांची भागीदारी केली. मागील सामन्यातील शतकवीर स्टोक्सने आज ७६ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ८४ धावा चोपल्या. जो रूटही ७२ चेंडूंत ६० धावांवर शाहीनच्या गोलंदाजीवर बाद झाला. जॉस बटलर आणि हॅरी ब्रुक यांनी २६ चेंडूंत ४२ धावांची भागीदारी केली. ब्रुकने १७ चेंडूंत ३० धावा कुटल्या. बटलर १७ चेंडूंत २७ धावांवर रन आऊट झाला. इंग्लंडने ५० षटकांत ९ बाद ३३७ धावा केल्या.