27.3 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रराळेगाव येथे भीषण अपघात; चार ठार

राळेगाव येथे भीषण अपघात; चार ठार

यवतमाळ : स्वागत समारंभ आटोपून गावाकडे परत निघालेल्या मंडळींच्या वाहनाला झालेल्या अपघातात दोन सख्ख्या बहिणींसह चार जण ठार झाले. ही घटना रविवारी पहाटे २:३० वाजेच्या सुमारास कळंब मार्गावरील वाटखेड गावानजीक घडली. या घटनेतील सर्व मृत यवतमाळ शहरालगतच्या लोहारा गावातील आहेत.

यवतमाळच्या लोहारा परिसरातील राऊत यांच्या मुलीचे लग्न खैरी येथील अनिकेत ताजने याच्याशी २६ एप्रिल रोजी ढुमणापूर येथे पार पडले. या विवाह सोहळ्याचा स्वागत समारंभ खैरी (ता. राळेगाव) येथे शनिवारी आयोजित करण्यात आला होता. यासाठी पाहुणे मंडळी एम.एच.३७/बी-६८२३ या क्रमांकाच्या स्कूल बसने खैरी येथे गेली होती. रात्री उशिरा ही मंडळी परतली. मार्गात राळेगाव-कळंब मार्गावरील वाटखेड गावाजवळ या वाहनाचा टायर पंक्चर झाला. दुरुस्तीसाठी हे वाहन थांबल्यानंतर काही मंडळी खाली उतरली, तर काही त्यातच बसून होती.

पंक्चर काढण्याचे काम सुरू असतानाच एम.एच.२६/एच-८४४४ या क्रमांकाच्या ट्रकची पाहुणे मंडळींच्या बसला जोरदार धडक बसली. या घटनेत श्रृती गजानन भोयर (१२ वर्षे), परी गजानन भोयर (१३ वर्षे) या दोन सख्ख्या बहिणी, लीलाबाई पातुरकर (४०) आणि नीलेश काफेकर (४२) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील सर्व दहाही जखमींना तातडीने यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जखमींमध्ये माया धांदे, छकुली बंधरे, सोनू काफेकर, आर्यन काफेकर, रूणाल बुरांडे, कुणाल काफेकर, शालीनी बुरांडे, नीलेश काफेकर, अक्षय राऊत (सर्व रा. घोन्सी, ता. पांढरकवडा) यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती राळेगाव येथील प्रवीण महाजन यांनी राळेगाव पोलिसांना कळविली. सचिन दरणे, शशिकांत धुमाळ, वसीम पठाण यांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. याप्रकरणी ट्रकचालक गजानन नामदेव हेने (रा. आर्णी) याला राळेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार रामकृष्ण जाधव करीत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR