हैदराबाद : तेलंगणामध्ये सर्वच पक्षांच्या आक्रमक प्रचाराला सुरवात झाली आहे. ज्युबली हिल्स मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर निवडणुकीच्या काही आठवड्यांपूर्वी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे दाखल झाल्यानंतर काँग्रेस आणि अझरुद्दीन यांच्या चिंता वाढल्या आहेत. तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
अझरुद्दीन यांच्यावर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या (एचसीए) अध्यक्षपदाच्या कार्यकाळात निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. रचकोंडा पोलिसांनी अझरुद्दीन यांच्यासह एचसीए पदाधिकारी आणि माजी सदस्यांविरुद्ध चार गुन्हे दाखल केले आहेत. आता अझरुद्दीन यांनी त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांबाबत जामिनासाठी मलकाजगिरी न्यायालयात धाव घेतली आहे.
अझरुद्दीन यांनी या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, माझ्या प्रतिस्पर्ध्यांनी माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी केलेला हा निवडणूक स्टंट आहे. हे प्रेरित आरोप आहेत. माझा या आरोपांशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही. वेळ आल्यावर मी पुढील प्रतिक्रिया देईन. माझ्या प्रतिस्पर्ध्यांनी माझी प्रतिमा डागाळण्यासाठी केलेला हा स्टंट आहे, पण त्यामुळे आम्ही कमकुवत होणार नाही. यामुळे आम्ही अधिक मजबूत राहू आणि कठोरपणे निवडणुकीला सामोरे जाऊ, असे ते म्हणाले.