28.8 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात उष्णतेची लाट

राज्यात उष्णतेची लाट

सोलापुरात उच्चांकी तापमान, तप्त वातावरणात नेत्यांची कसोटी

पुणे : प्रतिनिधी
राज्यात उष्णतेची लाट उसळली असून, सोलापुरात रविवारी यंदाच्या उन्हाळ््यातील सर्वोच्च ४३.७ अंश सेल्सिअस पारा नोंदला गेला. एकीकडे पारा वाढत चाललेला असतानाच लोकसभा निवडणुकीचा प्रचारही शिगेला पोहोचत आहे. त्यातल्या त्यात सोलापूर जिल्ह्यात तर सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात चुरस वाढली आहे. त्यामुळे तापलेल्या वातावरणात दुपारच्या वेळी राजकीय नेत्यांची कसोटी लागत आहे. त्यातच सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यानंतर शरद पवार-उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा आहे. त्यामुळे तापमानासोबत सोलापुरात राजकीय वातावरणही तापले आहे.

राज्यात मागच्या चार दिवसांपासून तापमानात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी सर्वत्र रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. राजकीय नेते प्रचाराला लागले आहेत. परंतु दुपारच्या वेळी सभा घेताना गर्दी जमविण्यासाठी राजकीय नेत्यांना कसरत करावी लागत आहे. सोलापुरात रविवारी यंदाच्या उन्हाळ््यातील सर्वाधिक ४३.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. याच महिन्यात ५ तारखेला या हंगामातील ४३.१ अंश इतके सर्वाधिक तापमान नोंदले गेले होते. त्यानंतर काल ४२ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले. त्यानंतर आज तापमानाचा पारा आणखी वाढून ४३.७ अंश नोंदला गेला. त्यामुळे सोलापूरकर हैराण झाले आहेत. सकाळी नऊपासूनच उकाडा जाणवत आहे. रात्रीसुध्दा उष्म्याची धग जाणवत आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

सध्या उन्हाची तीव्रता वाढलेली असताना लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरणही तापले आहे. सध्या ठिकठिकाणी प्रचाराच्या तोफा धडाडात आहेत. प्रचारासाठी सभा, बैठका, मेळाव्यांसह मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वीच सोलापुरात भर दुपारी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा झाली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची सोमवारी सोलापुरात सभा होत आहे. त्यानंतर सोलापुरातच शरद पवार-उद्धव ठाकरे यांचीही संयुक्त सभा होणार आहे. तसेच ३० एप्रिल रोजी मोदी माढ्यात सभा घेणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सोलापुरात दाखल झाले आहेत. सध्या तळपत्या उन्हात सभांचा धडाका सुरू आहे. आता प्रचार शिगेला पोहोचला असताना तापमानाचा पारा आणखी वाढल्याने दुपारच्या वेळी नागरिकांची गर्दी वाढविणे कठीण असणार आहे. दरम्यान, मोदींच्या सभेनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभाही होणार आहे. त्यामुळे सभांचा धडाका सुरू असताना गर्दी जमविण्यासाठी नेत्यांना कसरत करावी लागणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR