कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये खराब हवामानामुळे मंगळवारी मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. उड्डाणादरम्यान अचानक हवामान बिघडल्याने पायलटच्या प्रसंगावधानामुळे पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील कोलाघाट येथे हेलिकॉप्टरचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. सुदैवाने या घटनेत मुख्यमंत्र्यांसह हेलिकॉप्टमधील प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत.
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी दमदम येथून हेलिकॉप्टरने केशपूरकडे जाण्यासाठी रवाना झाले होते. मात्र, प्रवासादरम्यान अचानक हवामानात मोठा बदल झाला. धुके, मुसळधार पाऊस आणि खराब दृश्यतेमुळे कोणताही धोका न पत्करता वैमानिकाने खबरदारीचा उपाय म्हणून कोलाघाट येथील एका मोकळ्या मैदानात हेलिकॉप्टर सुरक्षितपणे उतरवण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री त्यांच्या या दौ-यादरम्यान पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील केशपूर येथे जात होते.
भारताचे महान स्वातंत्र्यसेनानी अमर हुतात्मा खुदीराम बोस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा त्यांचा कार्यक्रम होता. हवामान बिघडल्यामुळे हवाई मार्गाने पुढील प्रवास करणे शक्य नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची सुरक्षा आणि वेळेचा विचार करून त्यांच्या प्रवासाच्या मार्गात बदल करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी रस्ते मार्गाने केशपूर येथील आपल्या नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणाकडे रवाना झाले.
















