मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज (२२ जुलै) पहिली जयंती आहे. सहा महिन्यांपूर्वी म्हणजे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळाजवळील गोजूबावी गावात विमान कोसळले आणि अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या जयंतीचा शासकीय सूचीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आज राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांबरोबरच सर्व महाविद्यालये व सर्व शाळांमध्ये अजित पवार यांना अभिवादन करण्यात आले. अजित पवारांच्या चुलत बहीण सुप्रिया सुळे आणि पुतण्या रोहित पवार यांनी देखील अजित पवारांना अभिवादन केले आहे.
सुप्रिया सुळे यांनी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटले की, प्रिय दादा, आज तुझा जन्मदिन आहे. या दिवसाला जयंती म्हणण्याची हिंमत होत नाही. आज अनेक आठवणींंनी मनात गर्दी केली आहे. मोठा भाऊ म्हणून तू नेहमीच मायेची सावली धरली. ती सावली आज आम्हा भावंडांच्या डोक्यावर राहिली नाही, याचं दु:ख कायमच राहणार आहे.
दादा, आज केवळ कुटुंबच नाही, तर महाराष्ट्रातील संपूर्ण जनता तुझी आठवण काढत आहे. तुझी शिस्त, कामाचा उरक, अमोघ वक्तृत्व आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र धावून जाण्याची तळमळ हे गुण आम्हा सर्वांसाठी कायम प्रेरणादायी राहिले आहेत. तुझे प्रशासकीय कौशल्य, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि जनतेप्रती असलेली निष्ठा महाराष्ट्राच्या विकासात मोलाची ठरली. महाराष्ट्र तुझे योगदान कधीही विसरणार नाही. तुझी उणीव महाराष्ट्राला तसेच आपल्या संपूर्ण कुटुंबाला कायम भासत राहील. दादा, तुझी प्रत्येक आठवण मनात कायम जिवंत आहे. जणू तू अजूनही आपल्या अवतीभवती असल्यासारखं वाटतं. आम्हाला तुझी आठवण येतेय, दादा.. अशी भावूक पोस्ट सुप्रिया सुळे यांनी लिहिली आहे.
















