31.8 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रगंभीर दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये इंदापूरचा समावेश करावा

गंभीर दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये इंदापूरचा समावेश करावा

हर्षवर्धन पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

इंदापूर : अवर्षणप्रवण क्षेत्रात असणा-या इंदापूर तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी इंदापूर तालुक्याचा समावेश गंभीर दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये करावा, अशी मागणी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

सन २०२३ च्या खरीप हंगामाच्या परिस्थिती संदर्भात राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीने तयार केलेल्या अहवालाच्या आधारे राज्य शासनाने गंभीर दुष्काळाच्या छायेत असणा-या ४३ तालुक्यांची दुष्काळग्रस्त व मध्यम दुष्काळग्रस्त अशा दोन भागात विभागणी केली आहे. २४ तालुक्यांचा गंभीर दुष्काळग्रस्त भागात तर १६ तालुक्यांचा मध्यम दुष्काळग्रस्त भागात समावेश केला आहे. त्याच्या अनुषंगाने शासनाने अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाचा हा निर्णय शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने स्तुत्य व चांगला आहे, असे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पाटील यांनी नमूद केले आहे.

इंदापूर हा अवर्षणप्रवण भागातील तालुका आहे. यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत तालुक्यात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला आहे. परिणामी गंभीर दुष्काळग्रस्त असलेल्या २४ तालुक्यांमध्ये जशी गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील नागरिक व शेतक-यांना दुष्काळाच्या झळा बसत आहेत.

या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्याचा समावेश मध्यम स्वरूपाच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये करण्यात आल्याची बाब वस्तुस्थितीशी विसंगत आहे. गंभीर दुष्काळग्रस्त तालुक्यात लागू असणा-या शासनाच्या सवलती जर इंदापूर तालुक्यातील शेतक-यांना मिळाल्या तर या संकटावर मात करणे शक्य होणार आहे. त्यामुळे गंभीर दुष्काळग्रस्त तालुक्यात इंदापूर तालुक्याचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी पाटील यांनी पत्रात शेवटी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR