भोपाळ : हनिमूनसाठी गोव्याला जायचे सांगून अयोध्येला नेल्याने मध्य प्रदेशातील भोपाळच्या एका महिलेने घटस्फोटासाठी फॅमिली कोर्टात अर्ज दाखल केला आहे. या घटनेची चर्चा सध्या सोशल मीडियामध्ये सुरु आहे. या जोडप्याचे कोर्टाकडून समुपदेशन केले जात आहे.
रिलेशनशिप काऊन्सिलर शाईल अवस्थी यांनी सांगितलं की, या जोडप्याचं गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात लग्न झालं आहे. यातील नवरा मुलगा हा आयटी इंजिनिअर आहे. लग्नानंतर नववधूला आपल्या पतीला परदेशात हनिमूनसाठी जाण्याच्या मागणी केली होती. पण तिच्या नव-याने आपण भारतातील एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊयात तशी माझ्या आई-वडिलांची इच्छा असल्याचे म्हटले होतं. पण या वादात त्यांचे हनिमूनसाठी गोव्याला जायचे ठरले.
गोवा ट्रिपच्या एक दिवस आधी नव-याने आपल्याला आपण अयोध्या आणि वाराणसीला चाललो आहोत कारण माझ्या आईची तशी इच्छा असल्याचे सांगितले. यानंतर या जोडप्याने अयोध्या-वाराणसी केले. पण परतल्यानंतर त्यांच्यात जोरदार वाद झाला, यानंतर महिलेनं थेट पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.
अवस्थी म्हणाली की, महिलेनं आरोप केला की पतीनं तिचा विश्वास तोडला आहे आणि असाही आरोप केला की, त्यांनी लग्नाच्या सुरुवातीपासूनच आपल्यापेक्षा आपल्या विस्तारित कुटुंबाला प्राधान्य दिले पण आता या दोघांनी आपलं नात संपवू नये यासाठी समुपदेशन सुरु केलं आहे.