श्रीनगर : जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी नेटवर्क आणि त्यांना कथित मदत करणा-यांविरोधात सुरक्षा यंत्रणांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. उत्तर कश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर आणि आसपासच्या भागात रविवारी सकाळी पोलिसांनी बंदी घातलेल्या जमात-ए-इस्लामीशी संबंधित कथित नेटवर्कविरोधात मोठी शोधमोहीम राबवली. या कारवाईदरम्यान तब्बल २६ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकण्यात आले. ही कारवाई बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा (यूएपीए) अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या प्रकरणाच्या तपासाचा भाग असल्याचे अधिका-यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या मदतीने सोपोरमधील अनेक भागांमध्ये सकाळपासून शोधमोहीम सुरू केली. सादिक कॉलनी, बोमाई, गोरिपोरा, तर्जू, शुटलू रोहामा तसेच रफीबादमधील बेहरामपोरा यांसह विविध भागांमध्ये सुरक्षा पथकांनी झडती घेतली. संशयित व्यक्ती, ठिकाणे आणि बंदी घातलेल्या संघटनेशी संबंधित कथित नेटवर्कबाबत महत्त्वाचे पुरावे मिळवणे हा या कारवाईचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. सुरक्षा दलांनी संबंधित ठिकाणी कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे किंवा इतर संशयास्पद साहित्य आहे का, याची तपासणी केली. मात्र, शोधमोहीम सुरू असताना कोणतीही अधिकृत जप्ती करण्यात आली आहे का, याबाबत पोलिसांनी अद्याप माहिती दिलेली नाही.
सोपोरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक इफ्तिखार तालिब यांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या शोधमोहिमेला दुजोरा दिला आहे. यूएपीए अंतर्गत नोंदवलेल्या एका प्रकरणाच्या तपासाच्या संदर्भात ही कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या प्रकरणात आतापर्यंत कोणाला अटक करण्यात आली आहे का, याची अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही. शोधमोहीम पूर्ण झाल्यानंतर जप्त करण्यात आलेल्या साहित्याबाबत तसेच पुढील कारवाईबाबत माहिती दिली जाईल असे अधिका-यांनी सांगितले.
शोधमोहीम सुरू असलेल्या भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी सुरक्षा दलांच्या पथकांनी परिसराची तपासणी केली असून संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. दहशतवादी कारवायांना कथित मदत करणा-या नेटवर्कचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून अशा कारवाया सातत्याने केल्या जात आहेत. दरम्यान, २५ मे रोजी राष्ट्रीय तपास संस्थेने काश्मीर खो-यातील अनेक ठिकाणी छापे टाकले होते. दहशतवादी वित्तपुरवठ्याशी संबंधित तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली होती.
















