40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeअंतरराष्ट्रीयजपानने तयार केला जगातील पहिला लाकडी उपग्रह

जपानने तयार केला जगातील पहिला लाकडी उपग्रह

अमेरिका करणार लाँच प्रदुषणात होणार घट

टोकियो : जपान आणि अमेरिका मिळून सध्या एका महत्त्वाकांक्षी अवकाश मोहिमेवर काम करत आहेत. जगातील पहिला लाकडी उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी हे देश सज्ज झाले आहेत. लिग्नोसॅट असे या उपग्रहाचे नाव आहे. यंदाच्या उन्हाळ्यात हा उपग्रह लाँच करण्यात येईल.

हे प्रक्षेपण एक प्रयोग म्हणून केले जाणार आहे. सध्या अंतराळात हजारो निकामी उपग्रह आहेत. यामुळे पृथ्वीभोवतीचा स्पेस-कचरा ही एक मोठी समस्या बनली आहे. यातील कित्येक उपग्रह पृथ्वीवर कोसळण्याचाही धोका असतो. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून लाकडी उपग्रहांचा वापर करण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. या उपग्रहाची निर्मिती जपानच्या क्योटो विद्यापीठातील संशोधकांनी केली आहे. यासाठी सुमिमोटो फॉरेस्टरी कंपनीने देखील सहकार्य केले आहे. तर याला अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासाच्या रॉकेटचा वापर करण्यात येणार आहे. दि गार्डियनने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केले आहे.

कोणत्या लाकडाचा वापर?
अंतराळातील दबाव, प्रवास सगळ्या गोष्टींना सहन करण्याची क्षमता उपग्रहांमध्ये असते. यासाठी मुख्यत्वे ते मेटलचा वापर करून तयार केले जातात. यामुळे लाकडापासून उपग्रह बनवताना सगळ्यात मोठे चॅलेंज हे मजबूत लाकूड शोधणे होते. यामुळे मग मॅग्नोलिया लाकडाचा वापर करण्याचा निर्णय घेतला.

प्रदूषणाला बसणार आळा
पृथ्वीच्या वातावरणात जे उपग्रह पुन्हा प्रवेश करतात, ते खाली कोसळत असताना हवेशी घर्षण होऊन जळून जातात. यावेळी त्यातून लहान-लहान ऍलुमिना कण हवेत पसरतात. हे कण पृथ्वीच्या वातावरणात कित्येक वर्षं टिकून राहतात, ज्यामुळे प्रदूषणाचा धोका आहे. लाकडी उपग्रहामुळे हा धोकाही कमी होणार आहे. लाकडाचा उपग्रह असल्यामुळे पृथ्वीवर कोसळत असताना तो पूर्णपणे जळून जाणार आहे. लाकूड हे बायोडिग्रेडेबल असल्यामुळे याचा पर्यावरणाला धोका नसल्याचं क्योटो विद्यापीठाच्या संशोधकांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR