32.8 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeआरोग्यपेटीएमच्या शेअर्समध्ये तेजी

पेटीएमच्या शेअर्समध्ये तेजी

मुंबई : आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई केली असली तरीही पेटीएमच्या शेअर्समध्ये गेल्या तीन सत्रांमध्ये तेजी असल्याचे दिसून आले आहे. सलग तीन सत्रांमध्ये पेटीएमच्या शेअर्समध्ये एकूण १५ टक्क्यांहून अधिकची वाढ झाली आहे.

आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएमच्या शेअर्समध्ये ५० टक्क्यांची घसरण झाली होती. परंतु गेल्या तीन दिवसांपासून गुंतवणूकदारांनी या समभागात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचे दिसून येत आहे. आरबीआयने पेटीएम बँकेला मुदत वाढवून दिली आहे. त्यानंतर पेटीएमने अ‍ॅक्सिस बँकेसोबत केलेला करार आणि बर्नस्टीनचे रेटिंगसंबंधित बातम्या यामुळे या शेअर्सची खरेदी करण्याकडे लोकांचा पुन्हा एकदा कल असल्याचे दिसून येत आहे. पेटीएमचा शेअर मंगळवारी ३७६.२५ रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाल्यानंतर ५ टक्क्यांची मर्यादा घालण्यात आली होती.

अलीकडेच पेटीएमला दिलासा देत आरबीआयने ठेवी स्वीकरण्यास बंदी घालण्याची मुदत २९ फेब्रुवारीवरून वाढवली असून ती १५ मार्च अशी केली आहे. याशिवाय फेमा कायद्याच्या उल्लंघनाचा तपास करणा-या ईडीला पेटीएम कंपनीविरुद्ध कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत असा दावा सोमवारी विविध प्रसारमाध्यमांच्या अहवालात करण्यात आला. गेल्या आठवड्यात, वन ९७ कम्युनिकेशन्सने आपले नोडल खाते अ‍ॅक्सिस बँकेला दिले होते. त्यामुळे त्यांच्या क्यूआर कोड, साउंड बॉक्स आणि कार्ड मशीनवरील संकटही टळले असून ते कायम कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शेअर्स ६०० रुपयांचा आकडा गाठण्याचा अंदाज
पेटीएमचे संस्थापक आणि एमडी विजय शेखर शर्मा सतत कंपनीचा बचाव करत होते. व्यापा-यांनी अफवांवर लक्ष देऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे. याशिवाय ब्रोकरेज फर्म बर्नस्टीनने कंपनीचे शेअर्स ६०० रुपयांचा आकडा गाठण्याची आशा व्यक्त केली आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेवरील बंदीबाबत आरबीआयने अलीकडेच एफएक्यू जारी केले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या शेअर्सवर होत असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR