नाशिक : शासकीय सदनिका लाटण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून सरकारची फसवणूक केल्याच्या १९९५ सालच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची कारावासाची शिक्षा कायम ठेवल्यानंतर प्रथम वर्ग न्यायालयाने काढलेल्या अटक वॉरंटनंतर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी स्वीकारला असून लागलीच नाशिक पोलिस कोकाटेंना अटक करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाली आहे.
माणिकराव कोकाटे सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना रुग्णालयातूनच अटक केली जाणार का, याबाबत चर्चा रंगली असून नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलिस अधिका-यांकडून मागवली आहे. कोकाटेंची सध्याची वैद्यकीय स्थिती, डॉक्टरांचा अहवाल आणि कायदेशीर बाबींची सखोल पडताळणी केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्याविरोधातही अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. विजय कोकाटे सध्या कुठे आहेत, याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसल्याने नाशिक पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

