36.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रलोकसभा निवडणुकीमुळे कोल्हापूर विमानतळ गजबजले

लोकसभा निवडणुकीमुळे कोल्हापूर विमानतळ गजबजले

विमानांसह हेलिकॉप्टरची १९५ ‘राजकीय उड्डाणे’

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी महिन्याभरात राष्ट्रीय व राज्य पातळीवरील प्रमुख नेत्यांनी कोल्हापुरात दौरे वाढविले आहेत. त्यामुळे कोल्हापूर विमानतळावर खासगी विमानांसह हेलिकॉप्टरनी १९५ राजकीय उड्डाणे घेतली आहेत. कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण व नवीन टर्मिनल भवनामुळे कोल्हापूर विमानतळाचे देशपातळीवर महत्त्व वाढले आहे.

निवडणुकीसाठी कमी वेळेत जास्तीत जास्त सभा व पदाधिकारी यांच्यासोबत नियोजनांची बैठक घेण्यासाठी नेतेमंडळींचा खासगी विमानाचा वापर वाढला आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून कोल्हापुरात राष्ट्रीय व राज्य पातळीवरील नेतेमंडळींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. उमेदवारी घोषित करण्यापासून, अर्ज भरण्यासाठी तसेच उमेदवारांच्या प्रचारासाठी विमानतळावर खासगी ७५ विमाने व हेलिकॉप्टर आले.

कोल्हापूर विमानतळावरून ८५ विमाने व हेलिकॉप्टर अन्य ठिकाणी गेली आहेत. विशेष म्हणजे शनिवार (ता. ४) एकाच दिवशी ३५ खासगी विमाने व हेलिकॉप्टर यांनी ये-जा केली. आजअखेर १९५ खासगी विमानांनी उड्डाण केले. विमानतळावरील नियमित विमान वाहतूकही सुरळीत सुरू आहे.
लोकसभेच्या प्रचारासाठी व नियोजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी व महायुतीचे स्टार प्रचारक व अन्य मंत्री विमानतळावर येऊन गेले आहेत.

हेलिकॉप्टरचाही वापर
यंदा लोकसभा निवडणुकीत शहरासह ग्रामीण भागातही प्रचारासाठी नेतेमंडळींनी भर दिल्याने हेलिकॉप्टरचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे, असे दिसून आले आहे. कमी वेळेत ग्रामीण भागात जाण्यासाठी हेलिकॉप्टर सोयीस्कर असल्याने त्यालाही प्राधान्य दिल्याचे दिसून आले. ‘विमानतळावर निवडणुकीनिमित्त १९५ खासगी विमाने व हेलिकॉप्टर येऊन गेली. नियमित विमाने व ‘नॉन शेड्यूल’ विमानांची वाहतूक यादरम्यान सुरळीत पार पाडली. ट्रॅफिक कंट्रोल, फायर सर्व्हिस, पोलिस यंत्रणा व संचार अधिकारी यांनी सेवाभावी वृत्तीने काम केल्याने विमानांची वाहतूक सुरळीत व वेळेत पार पडली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR