लातूर: NEET-UG परीक्षेत झालेल्या कथित पेपरफुटीच्या प्रकरणाने आता लातूरमध्ये खळबळ उडवून दिली आहे. शहरातील एका नामांकित कोचिंग क्लासने घेतलेल्या सराव परीक्षेतील तब्बल ४२ प्रश्न हे थेट मुख्य NEET-UG परीक्षेच्या प्रश्नांशी जुळल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक प्रकारानंतर प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश दिले असून पोलीस तपासाला वेग आला आहे.
NEET-UG परीक्षेचा निकाल लागल्यानंतर देशभरातून गोंधळ सुरू असतानाच, लातूरमधील एका खाजगी कोचिंग क्लासच्या सराव परीक्षेची (Mock Test) प्रश्नपत्रिका आणि मूळ प्रश्नपत्रिका यात कमालीचे साम्य दिसून आले. पालकांच्या दाव्यानुसार, सराव परीक्षेतील प्रश्नांची रचना आणि पर्याय हे मुख्य परीक्षेशी तंतोतंत जुळत आहेत.
कोचिंग क्लासच्या सराव पेपरमधील ४२ प्रश्न मुख्य परीक्षेत जसेच्या तसे आले. मोठ्या प्रमाणात प्रश्नांचे साम्य आढळल्याने पालकांनी पेपरफुटीचा संशय व्यक्त करत पोलिसांकडे धाव घेतली. तक्रारीची दखल घेत वरिष्ठ स्तरावरून या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. लातूर पोलीस आता या कोचिंग क्लासचे चालक, शिक्षक आणि प्रश्नपत्रिका काढणाऱ्या समितीची चौकशी करत आहेत.
“एखाद्या सराव परीक्षेत ४-५ प्रश्न जुळणे समजू शकते, पण ४२ प्रश्न जुळणे हा योगायोग असू शकत नाही. याची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी,” अशी मागणी त्रस्त पालकांनी केली आहे. या प्रकरणात आता कोणाचे धागेदोरे हाती लागतात आणि हा खरोखर पेपरफुटीचा प्रकार आहे की काही वेगळे षडयंत्र, हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल. या घटनेमुळे लातूरमधील शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

