लातूर : प्रतिनिधी
आनंद आणि चैतन्याचा उत्सव असलेला दिवाली अर्थात प्रकाशपचा सण अवघ्या पाच दिवसांवर आला आहे. दिवाळी सणासाठी लातूरची बाजारपेठ सज्ज झाली आहे. गणपती ,दसर-याच्या सणाला चांगली उलाढाल झाल्याने व्यावसायिकांमध्ये दिवाळीसाठीही उत्साह जाणवू लागला आहे. बाजारपेठेत दिवाळीसाठी लागणारे साहित्य झळकू लागले आहेत.
दिवाळी सणाच्या या मुर्हूतावर बाजारपेठेत मोठी उलाढाल होते. यंदाही ती होईल, अशी अपेक्षा आहे. खरीप हंगामातील पिकांची कापणी मळणी करून शेतकरी रब्बी हंगामाच्या उत्पादनात गुंतला आहे. यंदा पाऊसमान कमी झाल्याने शेतक-यांचे उत्पादन कमी झाले आहे. तरीही दिवाळीनिमित्त नागरिक नेहमीच्या उत्सहाने खरेदीसाठी बाहेर पडतील अशी आशा असून गणेशोत्सव व दस-याला ही बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली होती.
लातूरची बाजारपेठ कपड्यासाठी ही प्रसिध्द आहे. ग्राहकांच्या पसंतीला उतरतील, असे कपडे व्यावसायीकांनी विक्रसाठी आणले असून या कपड्यांना सर्वाधिक मागणी दिसून येत आहे. कुर्ता, चुडिदार, जॅकेट्स, ंिपं्रटेड कुर्ता, फॉर्मल शर्ट, टीशर्ट जीन्स, ब्लेझर्स तसेच लहान मुलांचे कपडे, साडया खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. अनेक ठिकाणी कपडे साड्यांवर सुट देण्यात येत असल्याचेही दिसत आहे. जागोजागी रांगोळी व पणत्यांची दुकाने आहेत. दिवाळीमध्ये रांगोळी व पणत्यांना सर्वाधिक मागणी असते. फराळचे साहित्य खरेदीसाठी आता गृहिणीची लगबग वाढणार आहे. दसरा सणावेळी सुर्वणपेढ्या गजबजल्याने सुवर्ण खरेदीलाही चांगली झाळाळी येणार आहे. धनत्रयोदशीला आणखी गर्दी वाढेल असा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तवला आहे.
दिवाळीसाठी फराळ घरोघरी हमखास तयार केला जातो. फराळासाठी लागणारे पोहे, शेंगदाणे, खोबरे, बेसनपीठ, मसाले, रवा, मैदा. साखर, तेल इत्यादी साहित्य खरेदीसाठी किराणा दुकानांसह सुपर मार्केटवर आता गर्दी वाढायला लागली आहे. शहरात तयार फराळाचे स्टॉलदेखील लागताना दिसत आहेत.