34.9 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeक्रीडाजडेजाच्या ‘पंजा’ने आफ्रिका घायाळ, भारताचा सलग आठवा विजय

जडेजाच्या ‘पंजा’ने आफ्रिका घायाळ, भारताचा सलग आठवा विजय

कोलकाता : भारतीय संघाचे वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. फलंदाज धावांचा पाऊस पाडत आहेतच, त्यात गोलंदाज विकेट्सची रांग लावून प्रतिस्पर्धींना हतबल करत आहेत. भारताने कोलकाताच्या ईडन गार्डनवर दक्षिण आफ्रिकेला स्वस्तात गुंडाळले. विराट कोहलीच्या विक्रमी शतकी खेळीनंतर रवींद्र जडेजाने पाच विकेट्स घेतल्या. युवराज सिंगनंतर वर्ल्ड कपमध्ये सामन्यात ५ विकेट्स घेणारा जडेजा दुसरा भारतीय फिरकीपटू ठरला.

भारतीय गोलंदाजांसमोर कोणत्याही फलंदाजाचा निभाव लागणे तसे अवघडच आहे. पण, आफ्रिकेच्या फलंदाजांनी यंदा प्रतिस्पर्धींना चांगला चोप दिला आहे. त्यामुळे चुरस अपेक्षित होती. मोहम्मद सिराजने दुस-याच षटकांत क्व्टिंन डी कॉकला ( ५) त्रिफळाचीत केले. रवींद्र जडेजाने ९व्या षटकात टेम्बा बवुमाचा(११) त्रिफळा उडवला आणि हेनरिच क्लासेनला ( १) पायचीत पकडले. मोहम्मद शमीनेही दोन धक्के दिले. त्याने एडन मार्कराम ( ९) व रॅसी व्हॅन डेर ड्युसेनला (१३) बाद करून आफ्रिकेचा निम्मा संघ ४० धावांत तंबूत पाठविले. डेव्हिड मिलर ( ११) चांगला खेळत होता, परंतु स्वीप मारण्याच्या प्रयत्नात जडेजाने त्याचा त्रिफळा उडवला. रोहित शर्माने त्यानंतर आक्रमक क्षेत्ररक्षण लावून आफ्रिकेच्या तळाच्या फलंदाजांवर दडपण निर्माण केले.

फलंदाज स्वत:च्या अगदी जवळ अवतीभवती क्षेत्ररक्षक पाहून थोडे दडपणाखाली गेले होतेच. जडेजाने पुन्हा एकदा अप्रतिम चेंडूवर केशव महाराजचा ( ७) त्रिफळा उडवला आणि आफ्रिकेला ६७ धावांवर सातवा धक्का बसला. कुलदीप यादवने आफ्रिकेची अखेरची आशा असलेल्या मार्को यानसेनला ( १४) बाद करून आठवा धक्का दिला. भारताने आफ्रिकेचा संपूर्ण संघ २७.१ षटकांत ८३ धावांवर माघारी पाठवला आणि २४३ धावांनी सामना जिंकला. भारताने २००३ आणि न्यूझीलंडने २०१५ मध्ये एकाच वर्ल्ड कपमध्ये ८ सामने ंिजकले होते. ऑस्ट्रेलिया सलग ११ ( २००३ व २०१५) विजयांसह अव्वल स्थानावर आहे.

तत्पूर्वी, रोहित शर्माने ( ४० धावा, २४ चेंडू) ज्या प्रकारे सुरुवात करून दिली. विराट कोहली व श्रेयस अय्यर यांच्या १३४ धावांच्या भागीदारीने संघाला मजबूत स्थितीत आणले. श्रेयस अय्यर ( ७७), सूर्यकुमार यादव ( २२) व रवींद्र जडेजा नाबाद ( २९) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने ५ बाद ३२६ धावांचा डोंगर उभा केला. विराटने १२१ चेंडूंत १० चौकारांसह नाबाद १०१ धावा केल्या आणि विराटचे हे वन डे क्रिकेटमधील ४९ वे शतक ठरले. त्याने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR