25.6 C
Latur
Wednesday, July 3, 2024
Homeपरभणीजीव मुठीत धरून शाळकरी मुलींचा जीवघेणा प्रवास

जीव मुठीत धरून शाळकरी मुलींचा जीवघेणा प्रवास

जिंतूर : तालुक्यातील आडगाव बाजार मंडळातील टाकळखोपा, श्रीरामवाडीसह इतर अनेक गावांतील मुली व मुलांना आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणासाठी शाळेपर्यंत जाण्यासाठी स्वत:चा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शालेय विद्यार्थी बस सुरू नसल्याने मिळेल त्या वाहनाला हात करून त्यातून जिवघेणा प्रवास करीत आहेत. या बद्दल ग्रामस्थांसह पालक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

जिंतूर तालुका एकीकडे शिक्षण क्षेत्रात अत्यंत मागे आहे तर दुसरीकडे शिक्षण घेण्यासाठी आतुर असलेल्या टाकळखोपा व श्रीरामवाडीसह तालुक्यातील अनेक गावांत विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बस नसल्याने समस्या भेडसावत आहे. या दोन गावातील जवळपास ६० विद्यार्थिनी आडगाव बाजार येथील शारदा विद्यालय येथे शिक्षण घेतात. दररोज शाळेत येजा करण्यासाठी सद्यस्थितीला शासनाची कोणतीच सुविधा उपलब्ध नसून या आधी मानव विकासची बस चालू असल्याने या विद्यार्थिनी या बसने येत होत्या. परंतु शाळा सुरू होऊन ही तब्बल एक महिना उलटला तरी एसटी महामंडळ प्रशासनाने ही बस अद्यापही सुरू केली नसल्याने या परिसरातील मुलीना मिळेल त्या वाहनाला हात देऊन वाहनाच्या पाठीमागे उभा राहून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

यामुळे अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. श्रीरामवाडी व टाकळखोपा येथील नागरिकांनी याबाबत आगार प्रमुखाकडे विचारणा केली असता आज, उद्या किंवा आठ दिवसापासून चालू करू असे सांगत असून अद्यापही मानव विकास गाडी चालू झाली नाही. मानव विकासची बस चालू करावी अशी मागणी श्रीरामवाडी टाकळखोपा येथील नागरिक करत आहे. जिंतूर एसटी डेपोत बसेस संख्या मागील दहा वर्षांपासून वाढलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे राजकीय पुढा-यांनी दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

मानव विकासची बस सुरू करा
टाकळखोपा परिसरातील अनेक मुलीं शिक्षणासाठी मिळेल त्या वाहनाने प्रवास करुन शिक्षणाचे धडे घेत आहे. संबंधित प्रशासनाला वेळोवेळी विनंती करून देखील बस सेवा सुरु केली नाही. त्यामुळे पाल्यांना आपल्या मुलीं घरापर्यंत येईपर्यंत काळजी होते. त्यामुळे डेपो मॅनेजर यांनी मुलींसाठी मानव विकासची बस सुरू करावी अशी मागणी सरपंच विश्वनाथ घुगे यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR