29.9 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeक्रीडालखनौचा चेन्नईवर रोमहर्षक विजय

लखनौचा चेन्नईवर रोमहर्षक विजय

चेन्नई : ऋतुराज गायकवाडच्या शतकाला लखनौ सुपर जायंट्सच्या मार्कस स्टॉयनिसने शतकानेच उत्तर दिले. चेन्नई सुपर किंग्सच्या २१० धावांचा पाठलाग करताना लखनौची आघाडीची फळी अपयशी ठरली. पण, स्टॉयनिसने देवदत्त पडिक्कल व निकोलस पूरन यांच्यासह अर्धशतकी भागीदारी करून लखनौच्या विजयाच्या आशा कायम राखल्या. त्याने आयपीएलमधील त्याचे पहिले शतक पूर्ण केले. त्याच्या शतकाच्या जोरावर लखनौने रोमहर्षक विजयाची नोंद केली आणि ६ विकेट्सने मॅच जिंकून गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली.

दीपक चहरच्या पहिल्याच षटकातकिं्वटन डी कॉक ( ०) त्रिफळाचीत झाला. पण कर्णधार लोकेश राहुल व मार्कस स्टॉयनिस यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, मुस्ताफिजूर रहमानने पाचव्या षटकात लोकेशला ( १६) माघारी पाठवून मोठा धक्का दिला. स्टॉयनिसने २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि संघाला १० षटकांत २ बाद ८३ धावांपर्यंत पोहोचवले. ११व्या षटकात ऋतुने मथिशा पथिराणाला गोलंदाजीला आणले आणि त्याने शेवटच्या चेंडूवर देवदत्त पडिक्कलचा ( १३) १५१ च्या वेगाने टाकलेल्या चेंडूवर त्रिफळा उडवला.

लखनौने १२.२ षटकांत फलकावर १०० धावा उभ्या केल्या. स्टॉयनिस चेन्नईची डोकेदुखी वाढवत होता. त्याला निकोलस पूरनची चांगली साथ मिळताना दिसली. लखनौला ३६ चेंडूंत ८७ धावा करायच्या होत्या. स्टॉयनिस व पूरन यांनी २६ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली आणि चेन्नईचे टेंशन वाढवले. शार्दूलने टाकलेल्या १६व्या षटकात पूरनने ६,४,६,२,१ अशा १९ धावा कुटल्या. २४ चेंडूंत ५४ धावा असा सामना लखनौच्या बाजूने झुकताना दिसला. स्टॉयनिस व पूरन यांची ७० ( ३४ चेंडू) धावांची भागीदारी पथिराणाने तोडली. पूरन १५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३४ धावांवर शार्दूलच्या हाती झेल देऊन परतला.

स्टॉयनिसने ५६ चेंडूंत ९ चौकार व ५ षटकारांसह शतक पूर्ण केले आणि १२ चेंडूंत ३२ धावा असा सामना अधिक चुरशीचा झाला. पथिराणाच्या षटकात ४,१,४,४,०,२ अशा १३ धावा लखनौच्या फलंदाजांनी चोपल्या. आता ६ चेंडू १७ धावा असा सामना लखनौच्या पारड्यातच होता. स्टॉयनिसने पहिल्या दोन चेंडूंवर १० धावा कुटल्या. त्यात तिसरा चेंडू नो बॉल राहिला आणि स्टॉयनिसने त्यावरही चौकार खेचला. चौकार खेचून स्टॉयनिसने सामना संपवला. लखनौने १९.३ षटकांत ४ बाद २१३ धावा करून सामना जिंकला. स्टॉयनिस ६३ चेंडूंत १३ चौकार व ६ षटकारांसह नाबाद १२४ धावा केल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR