38.7 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रशिखर बँक घोटाळा प्रकरणात सुनेत्रा पवारांना क्लीन चिट

शिखर बँक घोटाळा प्रकरणात सुनेत्रा पवारांना क्लीन चिट

पुणे : शिखर बँक घोटाळा प्रकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट मिळाली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट देताना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सांगितले की, सुनेत्रा पवार यांनी जय ऍग्रोटेकच्या संचालकपदाचा २०१० रोजी राजीनामा दिला. त्यामुळे या प्रकरणाशी सुनेत्रा पवार यांचा काहीही संबंध नाही, तसेच याबाबत कोणतेही पुरावे सापडले नाहीत त्यामुळे आता त्यांना क्लीन चिट मिळाली आहे.

शिखर बँकेच्या कामकाजाची नाबार्डने २००७ ते २०११ या काळात तपासणी केली होती. यात अनियमितता आढळली होती. त्यामुळे या बँकेची चौकशी करण्यात आली होती. यात बँकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले होते. तसेच २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे समोर आले होते. मात्र, पोलिस तपासात याबाबत कोणतेही पुरावे आढळले नव्हते त्यामुळे बँकेचे नुकसान झाले नसल्याचा रिपोर्ट पोलिसांनी कोर्टात सादर केला होता. तसेच बँकेने आतापर्यंत १ हजार ३४३ कोटी ४१ लाख वसूल केल्याचेही पोलिसांनी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

शिखर बँकेने नियमांचे पालन न करता साखर कारखान्यांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले होते. मात्र हे कारखाने तोट्यात गेले आणि एनपीए झाल्याने ते कमी किमतीत बँकेच्या संचालकांच्या निकटवर्तीयांना विकल्याचा आरोप झाला होता. यामुळे पवार कुटुंब अडचणीत आले होते. सक्तवसुली संचालनालयाने अजित पवार यांच्यावर जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात मनी लॉड्रिंगचा ठपका ठेवत तपास सुरू केला होता. मात्र काही दिवसांपूर्वी अजित पवारांना क्लीन चिट मिळाली होती.

या नेत्यांनाही मिळाली क्लीन चिट
शिखर बँक घोटाळा प्रकरणात केवळ सुनेत्रा पवार नव्हे तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांना देखील यामुळे दिलासा मिळाला आहे. या दोघांनाही क्लीन चिट मिळाली आहे. याप्रकरणी एकूण ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील बहुतांशी लोकांना दिलासा मिळाला आहे. दिलासा मिळालेल्यांमध्ये बहुतांशी लोक हे राजकारणाशी जोडलेले असल्याची माहितीही समोर आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR