33.6 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला पाडणार

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला पाडणार

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे हे महाराष्ट्रभर दौरा करत आहे. आज नाशिक जिल्ह्यात मनोज जरांगे आले असता त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला आम्ही पाडणार आहे. यांनी आम्हाला फसवले आहे असा निर्धारच मनोज जरांगे यांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सगळे जण सारखेच आहेत. तिघांनी बनून षड्यंत्र केले आहे. किती दिवस मराठ्यांची फसवणूक करणार आहात. मागच्या काळात आमचा महाविकास आघाडीने कार्यक्रम केला आणि आताही महायुतीच्या सरकारने तेच केले आहे. या दोघांना निवडणुकीत पाडा असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, मराठ्यांनो निवडणुकीला उभ राहण्यापेक्षा यांना पाडा. यांना पाडण्यात सुद्धा विजय आहे, मला समाजाव्यतिरिक्त बाकी काहीही कळत नाही. ६ जूनपर्यंत मराठ्यांना आरक्षण दिले नाही तर विधानसभेला उमेदवार देणार असा इशारा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

निवडणुकीचे दोन महिने म्हणजे यांचा पोळा
लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे म्हणाले की, हे दोन महिने म्हणजे यांचा पोळा आहे. यांच्यात विनाकारण जाऊ नका, फक्त मजा बघा. मराठा समाज वेळेला करेक्ट कार्यक्रम करणार आहे. टप्प्यात आल्यावर आम्ही कार्यक्रम करणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

जरांगेंची भुजबळांवर जोरदार टीका
निवडणुकीला उभे राहणे हा छगन भुजबळ यांचा धंदा आहे. स्वत: मोठे होऊन गोरगरिबांच्या पोटावर पाय देणे हा भुजबळांचा धंदा आहे. आमच्या नोंदी ओबीसीमध्ये सापडल्या आहेत. भुजबळ आणखी किती दिवस खोटे बोलणार आहेत. तुम्ही विरोध करत राहा, मी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण घेऊनच दाखवणार असा इशारा मनोज जरांगेनी भुजबळांना दिला आहे. तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी छगन भुजबळ यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. यावरून ओपनच्या मतदारसंघात हे निवडणूक का लढवतात? असा सवाल मनोज जरांगेंनी भुजबळांना विचारला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR