30.4 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसंपादकीय विशेषचैत्रीपाडव्याचा मतितार्थ

चैत्रीपाडव्याचा मतितार्थ

गुढीपाडवा म्हणजे नवीन कालगणनेची, नव्या वर्षाची सुरुवात. नवयुगाची ही सुरुवात संपूर्ण देशभरातच नव्हे तर परदेशातही साजरी केली जाते. आपल्या पूर्वजांनी ‘सुख-दु:ख समेकृत्वा’ असं म्हटलं आहे. याचं प्रतिक या सणानिमित्त प्रांताप्रांतात सेवन केल्या जाणा-या वेगवेगळ्या पदार्थांमधून होतं. कडूनिंब आयुष्यातलं दु:ख दर्शवितो, गूळ आणि पिकलेलं केळे आनंद दर्शवितात, मिरेपूड किंवा मिरची अर्थातच तिखटपणा म्हणजे राग दर्शवते, मीठ भीतीचं प्रतीक, चिंचेचा आंबटपणा तिटकारा, कंटाळा दर्शवतो, कैरी आश्चर्य दर्शविते. नव्या वर्षात आपल्याला या वेगवेगळ्या भावनांचे अनेक अनुभव येणार आहेत आणि ते अनुभव आपण सारखेपणानेच स्वीकारायचे हा त्यातला हेतू आहे.

त्र महिन्याचा पहिला दिवस, नव्या वर्षाची सुरुवात यालाच चैत्रीपाडवा असेही म्हणतात. प्रभू श्रीरामचंद्र १४ वर्षे वनवासात राहून अयोध्येत परतले याचा आनंद म्हणून गुढ्या उभारून त्यांचं स्वागत लोकांनी केलं म्हणून हा दिवस साजरा करतात, अशी कथा सांगितली जाते तर दुसरी एक आख्यायिका म्हणजे, ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टी निर्माण केली आणि नवीन कालगणना सुरू केली यासाठी या दिवशी उत्सव साजरा करायचा.

नव्या वर्षाचा पहिला दिवस संकल्प करायचा. त्यात रोजनिशी, दैनंदिनी लिहिणे, हिशेब लिहिणे, वैद्यकीय तपासणी करून घेणे, विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळविण्याचा, सुटी वाया न घालवण्याचा असे संकल्प केले जातात आणि सुरुवातीच्या काही दिवसांत ते नियमितपणे पाळले जातात नंतर मात्र हे संकल्प आपण कधी विसरलो हेसुद्धा आपल्याला आठवत नाही.
चैत्रातला हा पहिला दिवस. नवीन युगाची सुरुवात सगळ्या भारतभर एवढेच नाही तर परदेशातही साजरी केली जाते. खरं वाटत नाही का? वेगवेगळ्या प्रांतात त्याला वेगवेगळी नावं दिली आहेत. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात याला ‘युगादी’ असं म्हणतात, राजस्थानात ‘थपना’, सिंध प्रांतात ‘चेटी चंड’, मणिपूरमध्येही नवीन वर्षाचा दिवस तर पंजाबमध्ये ‘बैसाखी’ तामिळनाडूमध्ये ‘पुथांडू’, केरळमध्ये ‘विशू’ म्हणतात. मॉरिशसमध्येही हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा करतात तर बाली बेटावरचे लोक आणि इंडोनेशियातील लोक हाच दिवस ‘न्येपी’ म्हणून साजरा करतात.

असं असलं तरी गुढी मात्र बहुधा फक्त महाराष्ट्रातच उभारली जाते. गुढी ही काठीवर जरीचे वस्त्र बांधून त्यावर चांदीचं किंवा तांब्याचं भांड ठेवून, कडूनिंबाचा पाला बांधून, साखरेच्या गाठीची माळ अडकवून तयार केली जाते. कुटुंबप्रमुख पुरूष देवाची पूजा झाल्यावर गुढीची पूजा करून ती सूर्याच्या दिशेकडे बांधतो. कुटुंबातील मंडळी गुढीला नमस्कार करतात. सूर्यास्तानंतर गुढी उतरवतात. पूर्वी प्रत्येक घरात गुढी उभारली जायची. या रंगीबेरंगी गुढ्या रस्त्यावर फिरताना आकर्षक दिसायच्या. आता शहरात ही प्रथा मागे पडत चालली आणि देवघरात ठेवायची सुटसुटीत अशी छोटी गुढी अवतरली आहे.
चैत्र महिन्यात झाडाला नवी पालवी येते त्यामुळे आपलं मनही आनंदीत होतं. निसर्ग तर आपला शिक्षक आहेच; परंतु आपल्या पूर्वजांनी निसर्ग आणि आपलं आयुष्य याची सुरेख सांगड घातली आहे. पाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात कडूनिबांची पाने, जिरं, ओवा, गूळ याच्याबरोबर वाटून खाण्याची पद्धत आहे. कारण यामुळे वर्षभर आपलं आरोग्य चांगलं राहातं अशी समजूत आहे. काही जण आजही ही प्रथा आवर्जून पाळतात.

‘सुख-दु:ख समेकृत्वा’ असं आपल्या पूर्वजांनी म्हणून ठेवलंच आहे. याचं प्रतीक काय आहे हे ऐकलत तर आश्चर्य वाटेल! तेलगू लोक या दिवशी ‘उगादी पचडी’ हा पदार्थ खातात तर कानडी लोक बेवूबेला हा पदार्थ खातात. हा पदार्थ कडूनिंब, गूळ, पिकलेली केळी, मिरे पूड किंवा हिरवी मिरची, मीठ, चिंचेचा कोळ, कैरी यापासून बनलेला असतो. यातल्या प्रत्येक पदार्थाची चव आणि गुण वैशिष्ट्ये वेगळी आहेत ना! मग हे पदार्थ एकत्र करून का खायचे? असा प्रश्न पडला ना! या पदार्थांमधला कडूनिंब आयुष्यातलं दु:ख दर्शवितो, गूळ आणि पिकलेलं केळ गोडपणामुळे जीवनातला आनंद दर्शवितात, मिरेपूड किंवा मिरची अर्थातच तिखटपणा म्हणजे राग दर्शवते, मीठ भीतीचं प्रतीक, चिंचेचा आंबटपणा तिटकारा, कंटाळा दर्शवतो, कैरी आश्चर्य दर्शविते. नव्या वर्षात आपल्याला या वेगवेगळ्या भावनांचे अनेक अनुभव येणार आहेत आणि ते अनुभव आपण सारखेपणानेच स्वीकारायचे हा त्यातला हेतू आहे म्हणजे नवीन वर्ष जसं येईल तसा त्याचा स्वीकार करायचा. काही प्रांतांमध्ये या दिवशी पुराणपोळी करायची पद्धत आहे. ती दूध, तूप किंवा नारळाच्या दुधाबरोबरही खायची पद्धत आहे. महाराष्ट्रातही पुरणपोळी करायची पद्धत असे. अलीकडे मात्र श्रीखंडाला जास्त पसंती मिळाली आहे.

गुढीपाडव्याच्या आधी वसंतोत्सव सुरू होतो त्यामुळे लोकांचा मूड उत्सवाचा असतो. त्यातच आंब्यांचा हंगाम सुरू असल्याने सार्वजनिक समारंभात, नृत्य, गायन, साहित्यिक कार्यक्रमात डाळ, पन्हं पाहुण्यांना आवर्जून दिलं जातं. गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे अनेक गोष्टींचा शुभमुहुर्त करण्याचा दिवस. व्यवसाय, गृहप्रवेश, विवाह निश्चिती अगदी सरस्वती पूजनाने विद्यारंभही केला जातो. विवाह मुहुर्तांनाही या दिवसापासून सुरुवात होेते. पंचांगाची पूजा केली जाते. अलीकडच्या काळात वेगवेगळ्या आकर्षक वेषभूषा केलेल्या स्त्रिया आणि मुली, पारंपारिक पोषाख केलेले मुले, मुली रस्त्यावरून शोभायात्रा काढतात. यात पारंपारिक शस्त्रे हातात घेऊन घोड्यावरून मिरवली जातात आणि अभिनव पद्धतीने हा सण साजरा केला जातो. हे सगळं झालं आपल्या उत्सवप्रियतेबद्दल!

आपण सगळ्यांनी मात्र या नव्या वर्षाच्या नव्या दिवसाचा वेगळ्या प्रकारे विचार करण्याची खरोखरच गरज आहे. या चैत्रात फुललेली झाडं, नवी पालवी वर्षभर टिकावी, तिने आपल्याला सावली द्यावी यासाठी वृक्षतोड थांबविण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. प्रदूषणामुळे झाडांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रदूषणावर नियंत्रण ठेवले पाहिजे. प्रदूषण होऊ नये म्हणून स्वच्छता ठेवली पाहिजे. स्वच्छता ठेवण्यासाठी सगळ्यांचेच हात पुढे सरसावले पाहिजेत. वैशाखात होणारी होरपळ, ज्येष्ठ, आषाढातला अनियमित पाऊस हे सगळं टाळायचं असेल तर त्याची सुरुवात आपल्याला चैत्रातल्या पहिल्या दिवसापासून संकल्प करूनच करायला हवी. हे संकल्प कधी न विसरण्यासाठी करायचे. ब्रह्मदेवाने जग निर्माण केलेला हा दिवस म्हणजे आपण आपल्या जन्मासाठी गुढी उभारायची, असा हा आनंदाचा दिवस. मग ही गुढी उंच उंच कशी जात राहील हेही आपण बघायला हवे नाही का? मागील वर्षी केलेले संकल्प, त्यातले पूर्ण झालेले संकल्प, त्यांचे फलित याचा लेखाजोखा गुढीपाडव्याच्या दिवशी मांडायच्या आणि अपूर्ण गोेष्टी पूर्ण करायचा आणि नव्या कल्पना प्रत्यक्षात उतरवायचा संकल्प करायचा, असा हा दिवस. हे संकल्प सार्वजनिक जीवनात गटाने, समूहाने करण्याची गरज आहे. कारण या पर्यावरण प्रदूषणाचे गंभीर परिणाम आपल्याला सगळ्यांनाच भोगावे लागत आहेत. बदल तर आपल्याला अनेक क्षेत्रांमध्ये करण्याची गरज आहे; परंतु आपण सुरुवात जर निसर्गाचा मान राखून तिथपासून करायची ठरवली आणि खरोखरच बदल घडवून आणला तर हळूहळू इतर क्षेत्रांतही आपण नक्की बदल घडवून आणू आणि ती गुढी सगळ्यांच्याच कर्तृत्वाची असेल.

-डॉ. नीलम ताटके

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR