शुक्रवारची रात्र थरारक ठरली. द.आफ्रिकेविरुद्धचा सामना पाकिस्तानसाठी ‘करो या मरो’ असा होता. परंतु एकदा लागलेली गळती त्यांना थांबवता आली नाही. अपयश एकदा येण्यास सुरुवात झाली की ते असे झुंडीने येते. पाकला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बलाढ्य संघांना चकित करणे आवश्यक होते. सामना सुरू होण्यापूर्वी पाकपुढे जगावे की मरावे हा एकच प्रश्न होता. त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी प्रथम फलंदाजी पत्करली. परंतु शफिक आणि इमाम जोडीने दगा दिला. आता सारी जबाबदारी बाबर आझम आणि रिझवानवर होती. थोडा वेळ रिझवानने आशा निर्माण केली परंतु नंतर निराशाच केली. बाबरने अर्धशतक काढले खरे परंतु त्याने निर्धाव चेंडूच अधिक खेळून काढले.
नेहमीप्रमाणे पाकची मधली फळी कोसळली तेव्हा शादाब खान आणि सौद शकीलने संघाला तारले. या जोडीने ८४ धावांची भर टाकली त्यामुळे पाक संघाला २७० धावसंख्या दिसू शकली. सौद शकीलने अर्धशतक काढले तर शादाबने ४३ धावांचे योगदान दिले. भागीदा-या रचण्यातील अपयश हे पाकच्या पराभवास कारणीभूत ठरले आहे. फलंदाजांनी गोलंदाजांना करिष्मा दाखवण्यास पुरेशी ठरेल इतकी धावसंख्या उभारली होती परंतु ‘कुदरत का निझाम’ने पुन्हा एकदा नन्नाचा पाढाच म्हटला.
द. आफ्रिकेने प्रारंभापासूनच हाणामारी करत लक्ष्याचा पाठलाग सुरू केला. पहिल्या तिन्ही फलंदाजांनी तिशीच्या आतच राम म्हटले आणि पुन्हा एकदा मार्करम आणि क्लॅसेनवर शिवधनुष्य पेलायची जबाबदारी आली. वसिम ज्युनियर संघात आल्याने पाकच्या वेगवान मशिनला बळ मिळाले होते. शाहिन आफ्रिदीमध्ये पूर्वीसारखी भेदकता दिसत नाही. हॅरीस रौफकडे वेग आहे परंतु त्याने अचूकतेला फारकत दिली आहे. त्यामुळे त्याला खरपूस मार मिळतो. वसिम ज्यु.ने सतत १४० कि.मी. च्या वेगाने गोलंदाजी केली आणि बवुमा, क्लॅसेनच्या विकेटस् काढल्या. परंतु त्यालाही तंदुरुस्तीचा फटका बसला.
क्लॅसेन (१२), मिलर (२९) स्वस्तात बाद झाले तरी मार्करम खेळपट्टीवर होता. अडीचशे धावांपर्यंत सामना द. आफ्रिकेसाठी एकतर्फीच वाटत होता परंतु मार्करम ९१ धावांवर बाद झाला आणि हिचकॉकचा ‘हॉरर शो’ सुरू झाला. एकामागून एक विकेट पडत गेल्या आणि पाक संघाला जगण्याची आशा वाटू लागली. शाहिन आफ्रिदी, हॅरीस रौफ गाढ झोपेतून जागे झाल्याचे दिसले. शाहिनने ४५ धावांत ३, रौफने ६२ धावांत २ आणि वसिम ज्यु. ने ५० धावांत २ बळी घेतले. ७ बाद २५० वरून द. आफ्रिकेची ९ बाद २६० अशी स्थिती झाली तेव्हा त्यांच्यावरील ‘चोकर्स’चा शिक्का योग्य असल्याची खात्री पटली. केशव महाराज जिद्दीने उभा राहिला. एकेक धाव घेत त्याने विजयी चौकार मारला. काळवंडलेले द. आफ्रिकन चेहरे पुन्हा उजळले. पाक संघाला संपूर्ण फटके न खेळण्याची चूक भोवली. कारण किमान २० धावा त्यांना कमी पडल्या. पराभूत झाल्यानंतर पाक खेळाडूंच्या चेह-यावर ‘बना के क्यूं बिगाडा रे नसिबा’ चे भाव होते.
– सिली पाँईंट
अविनाश जोशी, लातूर