नांदेड : प्रतिनिधी
शहरातील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ३२ वर्षीय विवाहित महिलेवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या हल्ल्यात महिलेच्या पोटासह हातावर गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत तिची आई तिला घेऊन थेट इतवारा पोलीस ठाण्यात पोहोचली. गंभीर अवस्थेतील महिलेला पोलिसांनी तातडीने वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी धाव घेतली. पोलिस कर्मचारी अहमद खान तसेच महिला पोलिस कर्मचा-यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे जखमी महिलेला वेळेत रुग्णालयात दाखल करता आले.
निशा वैराळे (वय ३२) असे जखमी विवाहितेचे नाव असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत ती पोलीस ठाण्यात आल्यानंतर तेथील अधिकारी व कर्मचा-यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. तिला रुग्णवाहिकेची प्रतीक्षा न करता ऑटोच्या माध्यमातून इतवारा परिसरातील शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले. यावेळी महिला पोलिस कर्मचा-यांनीही तिच्यासोबत राहून आवश्यक ती मदत केली.
प्राथमिक माहितीनुसार, निशा वैराळे हिच्यावर तिच्या पतीनेच चाकूने हल्ला केल्याचे समजते. एखाद्या बाबतीत महिलेने घेतलेल्या हरकतीच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि त्यातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. मात्र, हल्ल्याचे नेमके कारण, घटनेचा क्रम आणि आरोपीची भूमिका याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
















