33.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्र१५ जागांवरून मविआत पेच

१५ जागांवरून मविआत पेच

मुंबई : प्रतिनिधी
महाविकास आघाडीतील निवडणूक समितीने अनेकवेळा बैठका घेऊन जागावाटपावर तोडगा निघाला असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्यक्षात अजूनही १५ जागांवरून पेच कायम असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामध्ये शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्यात आणि कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातही काही जागांवरून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. त्यामुळे अद्याप यावर मार्ग निघताना दिसत नाही. एकीकडे महाविकास आघाडीतील पेच आणि दुसरीकडे वंचित आघाडीचा इशारा यामुळे विरोधी आघाडीत आणखी तिढा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या असून, भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, राज्यात महाविकास आघाडीत चर्चेचे गु-हाळ सुरू आहे. राज्यातील ४८ पैकी ३३ जागांवर एकमत झाल्याचे सांगण्यात येत असून, १५ जागांवरून मतभेद असल्याचे समोर आले आहे. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात या जागांवर सहमती होताना दिसत नाही. त्यामुळे या जागांचा तिढा वाढत चालला आहे. मतभेद असलेल्या १५ जागांपैकी १० जागांवर कॉंग्रेस आणि शिवसेनेने दावा केलेला आहे. त्यामुळे या जागांवर या दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे यात आता वरिष्ठांनाच लक्ष घालावे लागणार आहे. महाविकास आघाडीच्या अखेरच्या बैठकीत खा. संजय राऊत यांनी आता निवडणूक समितीची बैठक होणार नाही, तर वरिष्ठांसोबत चर्चा करून मार्ग काढला जाऊ शकतो.

या जागांवरून मतभेद?
कॉंग्रेस आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेत एकूण १० जागांवरून मतभेद आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, जालना, रामटेक, अमरावती, यवतमाळ-वाशिम, शिर्डी, कोल्हापूर, मुंबई दक्षिण-मध्य आणि उत्तर-पूर्व मुंबई या जागांवर बैठकीत एकमत होऊ शकलेले नाही. यासोबतच राष्ट्रवादी कॉंग्रेसने काही जागांचा आग्रह धरलेला आहे. मात्र, कॉंग्रेससोबत त्या जागांवरही एकमत होताना दिसत नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR