23.4 C
Latur
Friday, December 6, 2024
Homeलातूरमिठाईला अ‍ॅल्युमिनियमचा वर्ख!

मिठाईला अ‍ॅल्युमिनियमचा वर्ख!

लातूर : एजाज शेख
दिवाळीनिमित्त बाजारपेठेत मिठाईची असंख्य दुकाने थाटण्यात आलेली आहेत. मिठाई आकर्षक दिसावी, मिठाई शाही दिसावी, ग्राहकांच्या पसंतीला ती उतरावी, याकरीता बहुतांश मिठाईला चांदीचा वर्ख लावला जातो. ख-या चांदीचा वर्ख दिसण्यात मलुल व मिठाईत मिसळल्यासारखा दिसतो. पण अ‍ॅल्युमिनियमचा वर्ख चमकत राहातो व त्याचे वेगळे अस्तित्व जाणवते. मिठाईला चांदीऐवजी अ‍ॅल्युमिनीयचा वर्ख लावला जात असेल तर ती ग्राहकांची फसवणुक नव्हे काय?, हा प्रकार अन्नभेसळीचा नव्हे काय?, जर असेल तर मग अन्न व औषध प्रशासनाकडे याविरुद्ध कार्यवाही का नाही?, असे अनेक प्रश्न सध्यातरी निरुत्तरीत आहेत. महागामोलाच्या चांदीचा वर्ख मिठाईला लावून ८०० ते ९०० रुपये किलो दराने विक्री करणे कसे परवडत असेल. जर हे परवडत नसेल तर मिठाईवरील तो वर्ख चांदीचा आहे की, अल्युमिनीयमचा याचा शोध घेणार कोण?, हा आखणी एक प्रश्न ग्राहकांना पडला आहे.

काळानुरुप मिठाईमध्ये बदल होत गेले. जेवणात एखादातरी गोड पदार्थ हमखास असतोच. त्यामुळे सर्वांना गोड पदार्थ हवाहवासा वाटतो. अगदी मधुमेहींनासुद्धा. परंतू, मिठाई खाताना कशाचीही तमा न बाळगता केवळ तोंड गोड झाले, यावर आपण समाधान मानत असतो. मात्र मिठाईत वापरण्यात आलेला चांदीचा वर्ख हा विषाचा अर्क आहे, याकडे आपले लक्षही नसते. म्हणून मिठाई खाताना जरा सांभाळूनच खाल्ले तर भविष्यात होणारे शारिरीक गंभीर परिणाम रोखता येतील.

शहरात कुठेही जा, मिठाईच्या दुकानातून नामवंत मिठाईवाले मिठाई अधिक आकर्षक दिसावी म्हणून मिठाईत चांदी वर्खचा वापर करतात. आकर्षक आणि पटकण डोळ्यात भरणारी ही मिठाई आरोग्याच्या दृष्टीने किती उपयुक्त आहे, याचा कोणीच विचार करीत नाही. मात्र काही माणसं खुप चिकित्सक असतात. अशा माणसांपैकीच एकाने मिठाईमध्ये वापरण्यात येत असलेला चांदीचा वर्ख, आरोग्यासाठी घातक आहे, यावर प्रतिबंधक घालावा, अशी मागणी केली आहे. परंतू त्या मागणीकडे अद्यापतरी गांभीर्याने पाहिले गेलेले नाही हे विशेष. साधारणत: मॅगो बर्फी, अंजीर बर्फी, गुलकंद बर्फी, सॅन्डवीच बर्फी, मलाई बर्फी, मोतीचूर लाडू, काजू कतली, म्हैसुरपाक, बदाम कतली, रोझ कतली, अंजीर कतली, काजू रोल, अंजीर रोल, पिस्ता कतली आदी मिठाईला चांदी वर्ख लावलेला असतो.

आज एक किलो चांदीसाठी लाखभर रुपये मोजावे लागत असताना या चांदीचा वापर मिठाईत करणे हे मिठाईवाल्यांना कसे परवडते? हा खरा प्रश्न आहे. खरे तर मिठाईला चांदीचा वर्ख लावणे मिठाईवाल्यांना अजिबात परवडत नाही, म्हणून मिठाईला अ‍ॅल्युमिनियम सारख्या हलक्या धातूचा वर्ख लावण्यात येत असलयाचे विश्वासनीय वृत्त आहे. तशी चर्चाही असते परंतू, या विषयी कोणी उघडपणे बोलण्यास पुढे येत नाही. चांदी किंवा अ‍ॅल्युमिनियम हे दिसायला एकसारखेच असल्यामुळे आणि याचा मिठाईतील वापर अत्यंत मर्यादीत स्वरुपाचा असल्यामुळे या गोष्टीची फारशी चिकित्सा होत नाही. असे असले तरी अ‍ॅल्युमिनियमचा वापर खाण्यात वारंवार होऊ लागला तर पोटाचे, आतड्याचे किंवा किडनीचे विकार संभवतात. त्यामुळे मिठाई खाताना थोडी काळाजी घेतलेलीच बरी.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR