धुळे : कुणबी नोंदी शोधमोहिमेमुळे आतापर्यंत राज्यातील ३२ लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे आपले आंदोलन इथेच यशस्वी झाले आहे. आता केवळ त्याला कायद्याचा आधार हवा आहे. २४ डिसेंबरच्या आत मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण असेच आपले सरकारसोबत ठरले आहे.
या मागणीसाठी जीव गेला तरी आपण एक इंचही मागे हटणार नाही, असा दृढनिश्चय मनोज जरांगे-पाटील यांनी येथे बोलून दाखविला. गावगाड्यातील ओबीसी समाज हा मराठा समाजासोबत असल्याचेही ते म्हणाले. नाव न घेता मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली.
मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांची रविवारी (ता. ३) दुपारी तीनला धुळ्यात जेल रोडवर सभा झाली. धुळे जिल्हा सकल मराठा समाजातर्फे या सभेचे आयोजन करण्यात आले. जरांगे पाटील म्हणाले, की एकट्या जळगाव जिल्ह्यात तब्बल साडेतीन लाख कुणबी नोंदी सापडल्याची मला माहिती मिळाली.
याचा अर्थ साडेसात लाख मराठा समाजबांधवांना आरक्षणाचा लाभ मिळाला. कुणबी नोंदी सापडल्यामुळे राज्यात आतापर्यंत ३२ लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे आपले आंदोलन इथेच यशस्वी झाले आहे. आता केवळ कायद्याची प्रतीक्षा आहे. एवढी वर्षे मराठा समाजाला जाणूनबुजून आरक्षणापासून दूर ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला.
आणखी किती बळी हवेत?
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अलीकडच्या काळात ६० पेक्षा जास्त आत्महत्या झाल्या, त्यापूर्वी ४२ आत्महत्या झाल्या. आणखी किती बळी सरकार घेणार आहे, असा सवाल श्री. जरांगे पाटील यांनी केला. माणुसकी जिवंत ठेवा, मुडदे पाडणे बंद करा. समाजासाठी शहीद होणे सोपे नाही, शहीद झालेल्या व्यक्तीच्या घरात डोकावून पाहा. समाजानेही अशा कुटुंबांना उघड्यावर सोडू नये, मदतीसाठी उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
ओबीसी मराठ्यांसोबत
मंत्री भुजबळ यांचे नाव न घेता श्री. जरांगे पाटील यांनी भुजबळांना लक्ष केले. मराठ्यांना विरोध म्हणून काही जण विरोध करत आहेत. गावखेड्यातला ओबीसी समाज हा मराठ्यांसोबत असल्याचा दावाही जरांगे पाटील यांनी केला. ओबीसी-मराठा असा वाद निर्माण करून काही जणांचे दंगल घडविण्याचे स्वप्न आहे. मात्र, त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ द्यायचे नाही, आम्हाला ते होऊ द्यायचे नाही.
समाजालाही आवाहन
ज्यांना आरक्षण आहे, त्यांनी आरक्षण नसलेल्या समाजबांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे. खानदेश व विदर्भातील मराठ्यांनी यासाठी उभे राहावे, महिलांनीही यासाठी जागृती करावी, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. मराठा समाजासह इतर सर्व पक्षांतील प्रस्थापितांवरही त्यांनी निशाणा साधला.