Homeमहाराष्ट्रअयानचे आक्षेपार्ह व्हीडीओ चोरणा-या उजेरवर नवा गुन्हा

अयानचे आक्षेपार्ह व्हीडीओ चोरणा-या उजेरवर नवा गुन्हा

अमरावती : प्रतिनिधी
संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून देणा-या परतवाड्यातील आक्षेपार्ह व्हीडीओ व्हायरल आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्या मोबाईलमधील न्यूड व्हीडीओ चोरून ते व्हायरल करणारा आरोपी उजेर खान याच्यावर परतवाडा पोलिसांनी रविवारी रात्री अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून लैंगिक छळ केल्याचा नवा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शनिवारी समोर आलेल्या १५ वर्षीय पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. मात्र, या जबाबातून तपासाला अपेक्षित ठोस दिशा मिळेल, असे ठोस काहीही निष्पन्न झाले नसल्याची माहिती पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी सोमवारी माध्यमांना दिली.

व्हीडीओ कांडाचा मास्टरमाईंड अयान अहमद (१९, रा. परतवाडा) याचा मित्र असलेला आरोपी उजेर खान इकबाल खान (वय २०, रा. अचलपूर) याने अयानच्या मोबाईलमधील पीडित मुलींचे व्हीडीओ व फोटो चोरून स्वत:च्या मोबाईलमध्ये घेतले आणि ते इतर सहा जणांना फॉरवर्ड केले होते. या गुन्ह्यात तो सध्या पोलिस कोठडीत असतानाच त्याच्यावर आणखी एका गुन्ह्याची नोंद झाली आहे. उजेर हा परतवाडा येथील एका १६ वर्षीय मुलीचा सतत पाठलाग करून तिला मोबाईलवर संपर्क साधून त्रास देत होता. मुलीच्या पालकांनी समज देऊनही त्याने हे कृत्य सुरूच ठेवले.

अखेर पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी त्याच्यावर लैंगिक छळवणुकीसाठी पाठलाग व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी, १३ एप्रिल रोजी रात्री अयान अहमदविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आतापर्यंत यात एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील मानव सुगंधे याने अयानला आपला अमरावती शहरातील भाड्याचा फ्लॅट तासिका तत्त्वावर दिला होता. तेथे त्याने दोन मुलींचे लैंगिक शोषण करून त्याचे रेकॉर्डिंग केल्याचे निष्पन्न झाले होते. तर उजेर याने अन्य पाच जणांना ते व्हीडीओ व फोटोग्राफ्स फॉरवर्ड केले होते.

पीडितेच्या जबाबाने पोलिसांची निराशा
या प्रकरणातील आठ पीडित मुलींपैकी एका १५ वर्षीय पीडितेने समोर येऊन जबाब नोंदवला. १८ एप्रिल रोजी विशेष तपास पथकातील महिला पोलिस अधिकारी तसेच महिला व बाल कल्याण अधिका-यांसमोर नोंदवण्यात आलेला हा जबाब मूळ गुन्ह्याच्या तपासात जोडण्यात आला आहे. मात्र, ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीच्या जबाबात अयान अहमदविरुद्ध गुन्हा दाखल होईल, असा कोणताही ठोस मजकूर आढळलेला नाही. त्यामुळे या प्रकरणातील मुख्य आरोपीला घेरण्यासाठी पोलिसांना आता अधिक डिजिटल पुराव्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे. ‘आम्ही तिला पुन्हा बोलते करण्याचा प्रयत्न करू,’ असे एसपींनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR