कोलकाता : २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. या निमित्ताने कोलकाता येथील रेड रोडवर विशेष योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात हजारो लोक सहभागी होणार आहेत. तब्बल ३० हजार लोक योग करण्याची तयारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यावेळी विशेष उपस्थिती असेल.
त्यांच्या सिक्योरिटीच्या दृष्टीने, प्रशासनाने रेड रोडसह शहरातील सात प्रमुख रस्ते मध्यरात्रीपासून ते कार्यक्रम संपेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. रस्त्यावर जर नमाज नाही, तर मग योग का? असा प्रश्न मुस्लीम समुदायाच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला आहे. तसेच सरकारची ही दुहेरी भूमिका असल्याचा आरोपही त्यांंनी केला आहे.
मुस्लीम समुदायाच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे की, याच वर्षी ईदची नमाज, वाहतुकीचे कारण सांगत रेड रोडवरून ब्रिगेड परेड ग्राउंडमध्ये हलवण्यात आली होती. जलपाईगुडी मशिदीचे इमाम हाफिज मोहम्मद नईमुद्दीन गाझी यांनी राज्यघटनेच्या अनुच्छेद १५ चा, समान अधिकाराचा हवाला देत, रस्ते बंद होण्याचा नियम सर्वांना समान असावा, असे म्हटले आहे. याशिवाय, खातीम मोहम्मद यांनीही, मुस्लीम समुदायाने प्रशासनाचे नियम पाळले, मग आता त्याच जागी योग दिनाच्या एवढ्या मोठ्या आयोजनाला परवानगी का दिली जात आहे असा प्रश्न उपस्थित केला.
यासंदर्भात बोलताना भाजप नेते आणि पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री दिलीप घोष म्हणाले, आधी अनेक वर्षे मशिदी जवळ असतानाही रेड रोडवर नमाजमुळे मोठी कोंडी होत होती. मात्र, पंतप्रधानांचा हा कार्यक्रम राष्ट्रीय महत्त्वाचा असून त्यांच्या सुरक्षेच्या प्रोटोकॉलसाठी काही तास रस्ते बंद करणे गरजेचे आहे. हा कार्यक्रम कोणत्याही मैदानावर झाला असता, तरी सुरक्षेसाठी आजूबाजूचा परिसर बंद करावाच लागला असता. हे सर्व जनहितासाठी असून सर्वांनी कायद्याच्या कक्षेत राहायला शिकायला हवे.
















