37.7 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्याकांदा निर्यातबंदी उठविली

कांदा निर्यातबंदी उठविली

केंद्र सरकारचा निर्णय, शेतक-यांच्या डोळ््यात धूळफेक, विरोधकांची टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने कांद्याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. कांद्यावरील निर्यातबंदी आता उठवण्यात आली असून भारतातील कांदा आता जगभरात कुठेही ५५० डॉलर प्रतिमेट्रिक टन या किमान निर्यात शुल्क दराने विक्री केला जाणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रात राजकारण पुन्हा चांगलेच पेटले असून हा निर्णय म्हणजे ऐन निवडणुकीच्या काळात शेतक-यांच्या डोळ््यात धूळफेक करणारा असल्याची टीका शेतकरी संघटनांसह विरोधकांनी केली. दुसरीकडे आमचे सरकार नेहमी शेतक-यांच्या पाठीशी असल्याचे मत सत्ताधारी नेते व्यक्त करत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून कांदा हा शेतक-यांना हसवतो कमी आणि रडवतोच जास्त आहे. कधी अस्मानी संकट तर कधी केंद्र सरकारची बदलती धोरणे यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. गेल्या वर्षभरातील परिस्थिती सांगायची झाली तर कांद्याला चांगला भाव मिळायला सुरुवात झालेली असतानाच अचानक डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात कांदा प्रश्न चांगलाच पेटला. ठिकठिकाणी शेतक-यांसह संघटना रस्त्यावर उतरल्या आणि सरकारच्या या निर्णयाचा त्यांनी जोरदार निषेध केला.

सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण सध्या बघायला मिळत असतानाच दिंडोरीसह अनेक लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना प्रचारादरम्यान कांदा उत्पादक शेतक-यांच्या रोषाचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले. त्यातच शुक्रवारी रात्री केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने एक पत्रक जारी करत कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्याचा निर्णय घेतला. भारतातील कांदा आता जगभरात कुठेही ५५० डॉलर प्रतिमेट्रिक टन या किमान निर्यात शुल्क दराने विक्री केला जाणार आहे.

कांद्याला चांगला भाव मिळेल : भारती पवार
केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी म्हटले आहे की, आम्ही सगळ्यांनी मागणी केली होती की, काहीही करा आणि कांदा निर्यात खुली करा. या निर्णयामुळे कांद्याला चांगला भाव मिळेल. नोटिफिकेशनमध्ये स्पष्टता आहे की, किमान निर्यात मूल्य ५५० प्रति मेट्रिक टन असेल. त्यामुळे आता कोणीही मनात संभ्रम बाळगू नये. आता शेतक-यांना चांगला दर मिळेल, असेही त्या म्हणाल्या.

विरोधकांची टीका
कांद्याची निर्यात खुली करण्यात आल्याने राज्य सरकारवरचे एक मोठे संकट टळले. मात्र, याच निर्णयामुळे आता राजकारणाला तोंड फुटले आहे. ऐन निवडणुकीच्या काळात कांद्यावरची निर्यात खुली करण्यात आली असून हा निर्णय म्हणजे शेतक-यांच्या डोळ््यांत धूळफेक असल्याची टीका शेतकरी संघटनांसह विरोधकांकडून केली जाते आहे.

फडणवीसांचे उत्तर
विरोधकांसह शेतकरी संघटनांच्या पदाधिका-यांच्या टीकेला थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जशाच तसे उत्तर दिले. विरोधकांनी नेहमी राजकारण केले. मात्र आमच्या सरकारने नेहमीच शेतकरी आणि सर्वसामान्यांचे हित बघितले आहे, असे फडणवीस म्हणाले. यापुढे शेतक-यांना अच्छे दिन येवोत, असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR