33.1 C
Latur
Sunday, May 19, 2024
HomeUncategorizedकमळावरही लढण्याची तयारी; पण तिकिट द्या

कमळावरही लढण्याची तयारी; पण तिकिट द्या

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या अनेक खासदारांचे तिकिट भाजपच्या नेत्यांकडून कापले जाण्याची दाट शक्यता आहे. यामुळे उमेदवारीचा ‘शब्द’ घेऊन गद्दारीचा शिक्का मारून घेतलेल्या अनेकांच्या पोटात गोळा आला आहे. ‘काहीही करा; पण तिकिट ‘फिक्स’ करा असे साकडेच बारा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले आहे. त्यासाठी त्यांनी दबाव गट तयार केला असून, दोन दिवसांत ते एकत्रित भेटणार आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात राज्यातील शिवसेनेचे तेरा खासदार गेले. आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा उमेदवारी, भरपूर निधी असा शब्द त्यावेळी या सर्वांना देण्यात आल्याचे कळते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच असा शब्द दिल्याचे अनेक खासदार सांगतात. त्यामुळे तिकिट मिळेल या आशेवर सर्व जण खुश होते. आता मात्र, अनेकांना तिकिट मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याने ते अस्वस्थ झाले आहेत.

भाजपने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघात चार ते पाच वेळा सर्वेक्षण केले. यामध्ये काही मतदारसंघांत विद्यमान खासदारांविषयी नाराजी असल्याचा अहवाल मिळाला आहे. काही ठिकाणी उमेदवार पराभूत होतील असा अहवाल आल्याने तेथे उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत.

किमान कमळाच्या चिन्हावर लढल्यास काय होईल, याचाही अंदाज घेण्यात आला आहे. तेथेही नकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने अनेकांच्या उमेदवारीला कात्री लावण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. ‘जिंकणा-यालाच उमेदवारी’ असा निर्णय भाजपने घेतल्याने मुख्यमंत्र्यांचीही अडचण झाली आहे. एका खासदाराला उमेदवारी मिळणार नाही, याची खात्री आहे. उर्वरित बारा खासदार दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांची एकत्रित भेट घेणार आहेत. धनुष्यबाण शक्य नसेल, तर कमळ चिन्हावर लढण्याचीही आपली तयारी आहे; पण तिकिट द्या, असा आग्रह ते धरणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR