नवी दिल्ली : जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवरून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली असून एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करून इतिहास रचणा-या दोन भारतीय गिर्यारोहकांचा खाली उतरताना मृत्यू झाला आहे. या दोन भारतीयांपैकी एका गिर्यारोहकाने अवघ्या दोन दिवसांपूर्वीच एकाच दिवशी सर्वाधिक लोकांनी एव्हरेस्ट सर करण्याच्या जागतिक विक्रमात आपला सहभाग नोंदवला होता.
नेपाळच्या अधिका-यांनी शुक्रवारी या दु:खद घटनेची पुष्टी केली असून या घटनेमुळे गिर्यारोहण क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे. नेपाळच्या बाजूने बुधवारी ३ भारतीयांसह तब्बल २७४ गिर्यारोहकांनी एकाच दिवशी माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली होती. एकाच दिवसात एवढ्या मोठया संख्येने लोकांनी शिखर गाठण्याची ही पहिलीच वेळ होती आणि हा एक नवा जागतिक विक्रम ठरला होता. मात्र, हा आनंद फार काळ टिकू शकला नाही.
नेपाळच्या एक्सपीडिशन ऑपरेटर्स असोसिएशनचे सरचिटणीस ऋषी भंडारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पावलेल्या भारतीय पर्वतारोह्यांची ओळख अरुण कुमार तिवारी आणि संदीप अरे अशी झाली आहे. ८,८४८.८६ मीटर उंच असलेल्या एव्हरेस्टच्या शिखरावरून खाली उतरत असताना हे दोन्ही भारतीय पर्वतारोही प्रचंड थकले होते. तिथल्या अतिशय विषम हवामानात आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांचे शरीर साथ देईनासे झाले. त्यांच्यासोबत असलेल्या नेपाळी शेर्पा आणि गाईड्सनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र अतोनात कष्टांनंतरही ते या दोन्ही भारतीयांचे प्राण वाचवू शकले नाहीत.
असा झाला होता ऐतिहासिक जागतिक विक्रम
ऋषी भंडारी यांनी सांगितले की, संदीप अरे हे बुधवारी आणि अरुण तिवारी हे गुरुवारी संध्याकाळी ५.३०च्या सुमारास एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचले होते. संदीप अरे यांचा मृत्यू गुरुवारी झाला, तर अरुण तिवारी यांचा मृत्यू नेमका कधी झाला, याचा अचूक वेळ अद्याप समजू शकलेला नाही.
२७४ जणांमध्ये होते सामील
बुधवारी झालेल्या २७४ जणांच्या ऐतिहासिक चमूमध्ये संदीप अरे यांच्यासोबत तुलसी रेड्डी पालपुनूरी आणि अजय पाल सिंह धालीवाल हे इतर दोन भारतीयही सामील होते. या विक्रमी चमूमध्ये १५० नेपाळी शेर्पांचाही समावेश होता. या यशानंतर दुस-याच दिवशी म्हणजेच गुरुवारी भारताची लक्ष्मीकांता मंडल हिनेही जगातील सर्वोच्च शिखरावर पाऊल ठेवले होते.
यंदा ५०२ जणांना मिळाली होती परवानगी
नेपाळ सरकारच्या पर्यटन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वसंत ऋतू २०२६च्या या मोसमात एव्हरेस्ट चढण्यासाठी एकूण ५०२ पर्वतारोह्यांना परवानगी देण्यात आली होती. प्रतिकूल हवामानाशी झुंज देत अनेक गिर्यारोहक आपले स्वप्न पूर्ण करत आहेत. मात्र, अरुण तिवारी आणि संदीप अरे यांच्या मृत्यूने एव्हरेस्ट मोहिमेतील धोके पुन्हा एकदा समोर आणले असून माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर सध्या या दोन्ही शूरवीरांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
















