नांदेड (प्रतिनिधी) : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी लातूर येथील आरसीसी (RCC) क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केली असून ते सध्या कोठडीत आहेत. असे असतानाही, नांदेड शहरात मात्र मोटेगावकरांच्या आरसीसी क्लासेसचे एक भलेमोठे होर्डिंग एका मुख्य रस्त्यावरील मोक्याच्या इमारतीवर डौलाने झळकत आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने एवढी मोठी कारवाई केल्यानंतरही शहरात गुन्हेगारी प्रकरणातील व्यक्तीचे बॅनर उभे राहिल्याने नांदेड महानगरपालिकेच्या ‘अनधिकृत बॅनर हटाव’ मोहिमेचे पार धिंडवडे निघाले आहेत.
लातूर येथील नामांकित ‘आरसीसी’ कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांना नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य दुव्यांपैकी एक मानले जात आहे. काही दिवसांपूर्वीच सीबीआयने (CBI) त्यांना लातूरमधून ताब्यात घेतले आणि सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकरणाकडे लागलेले असताना, नांदेड शहरातील एका वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर, मोक्याच्या ठिकाणी असलेल्या बिल्डिंगवर मोटेगावकरांचे आणि त्यांच्या क्लासेसचे मोठेच्या मोठे होर्डिंग लावण्यात आले आहे.
मनपा आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
एकीकडे महानगरपालिका शहराला विद्रूप करणाऱ्या आणि अनधिकृत असलेल्या बॅनरवर कारवाईचा बडगा उगारल्याचा डांगोरा पिटत आहे. मात्र, सीबीआयच्या कोठडीत असलेल्या आरोपीचे इतके मोठे बॅनर महापालिकेच्या आणि पोलिसांच्या नजरेतून कसे सुटले? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या गंभीर गुन्ह्यातील आरोपीचे बॅनर खुलेआम झळकत असतानाही स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी त्यावर कोणतीही कायदेशीर किंवा दंडात्मक कारवाई केलेली नाही.
नागरिकांमधून तीव्र संताप
लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या पेपरफुटी प्रकरणातील आरोपीचे अशा प्रकारे शहरात उदात्तीकरण होत असल्याचे पाहून नांदेडकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. “सर्वसामान्यांच्या छोट्या-मोठ्या अनधिकृत फलकांवर तात्काळ कारवाई करणारी महानगरपालिका एवढ्या मोठ्या प्रकरणात सुस्त का?” असा सवाल नागरिक विचारत आहेत. या प्रकारामुळे मनपाची अनधिकृत बॅनरविरोधी मोहीम निव्वळ ‘कुचकामी’ आणि ‘दिखाऊ’ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आता प्रशासन हे होर्डिंग कधी उतरवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
















