पूर्णा : येथील धनगर गल्ली भागातील रहिवासी असलेले आणि खासगी सावकारी व्यवसायाशी निगडीत असलेले देवराव बैजाजी साखरे (वय ४८) शुक्रवार, दि. २२ मे रोजी पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. यावेळी दुचाकीवरून पाठीमागून आलेल्या अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. संपूर्ण शहराला हादरवून टाकणारी ही घटना गुड मॉर्निंग रोड रस्त्यावर घडली असून शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवराव साखरे हे दररोजच्या सवयीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ६.३० ते ७.०० वाजताच्या दरम्यान फिरायला घराबाहेर पडले होते. हिरो शोरूम ते राजमुद्रा चौक दरम्यान ते आले असता एका दुचाकीवरून दोन अज्ञात इसम तिथे पोहोचले. त्यांनी पाठीमागून येत साखरे यांना गाठले आणि काही कळण्याच्या आतच धारदार चाकूने त्यांच्या पोटात व हातावर सपासप वार केले. अचानक झालेल्या या भीषण हल्ल्यामुळे साखरे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. यावेळी हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेनंतर नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील, फौजदार प्रकाश इंगोले, कर्मचारी शैलेश टाकरस व बालाजी शेंबेवाड यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. गंभीर जखमी साखरे यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतू डॉक्टरांनी तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. साखरे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुलांचा परिवार आहे.
आर्थिक वादातून खूनाचा संशय
देवराव साखरे सावकारीशी निगडीत होते. त्यामुळे सावकारीतील पैशांचे जुने वाद, आर्थिक देवाणघेवाण किंवा कौटुंबिक पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असण्याचा संशय वर्तविला जात आहे. या पार्श्वभुमीवर पोलीस वेगवेगळ्या कोनातून तपास करत आहेत.
नवीन पोलिस निरीक्षकांसमोर आव्हान
पूर्णा पोलीस ठाण्याचा पदभार नुकताच पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी स्वीकारला आहे. ते रुजू होऊन काही दिवस होत नाहीत तोच हे हत्याकांड घडल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. शहरातील वाढती गुंडगिरी आणि अवैध धंद्यांचा बिमोड करण्याचे मोठे आव्हान आता नव्या पोलीस प्रमुखांसमोर उभे ठाकले आहे.
















