नाशिक : नीट असेल वा इतर परीक्षा देणारे विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. या मुलांकडे कुठलेही लक्ष नाही. दरवर्षी पेपर फुटताहेत. नीटचे आंदोलन सुरू असताना २ वेळा पेपर फुटले. शिक्षण व्यवस्थेकडे कुणाचे लक्ष नसेल. कुणी याला गांभीर्याने घेणार नसेल तर यावर मुलांनी चिडायचे नाही असं तुम्ही म्हणता. तरुणांनी रागवायचे नाही. शिव्या द्यायच्या नाहीत. शिव्या देण्याचा अधिकार फक्त भाजपाला आहे का, लोकांच्या आयाबहिणी काढण्याचा अधिकार भाजपाला आहे का? जर रास्त मागण्या करूनही दुर्लक्ष करत असतील तर लोकांनी काय करायचे? ही सुरुवात आहे. यापुढे काय काय गोष्टी होतील ते पाहात राहा असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर केला आहे. नाशिक येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, प्रत्येक आई वडिलांचा मुलगा नीट परीक्षेला बसला नव्हता. जंतर मंतर आंदोलनात असलेले सगळेच विद्यार्थी नीटचे नव्हते परंतु जे विद्यार्थी होते ते सभोवताली घडणा-या गोष्टींचा राग बाहेर काढणारे होते. हा राग आणखी जोरात बाहेर येईल. जंतर मंतरवरील आंदोलन ही सुरूवात आहे. सरकारबद्दलचा राग लोकांनी बाहेर काढला. हे आदोलन घराघरात गेले. विद्यार्थ्यांना ज्यारितीने मारले त्यातून प्रत्येक आई वडिलाला, आजी आजोबांना आपल्या घरातील मुलाला मारले हे वाटत होते. मुलांना का मारले गेले, हे आंदोलन शांततेत सुरू होते. सरकारनेच हे सुरू केले. भाजपातील अंतर्गत हे भांडण आहे. त्यातून या गोष्टी सगळ्या चव्हाट्यावर येताहेत असे त्यांनी म्हटले.
















