मुंबई : राज्यभरातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, आदिवासी विकास विभाग, शासकीय विद्यालये आणि खासगी शैक्षणिक संस्थांमधील एकूण ३० हजार २०९ शिक्षक व शिक्षणसेवक पदांसाठी पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रियेला गुरुवारपासून सुरुवात झाली. पात्र उमेदवारांना पदनिहाय पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरतीत स्व-प्रमाणपत्र पूर्ण केलेले १ लाख ७० हजार १०८ उमेदवार असल्याने भरतीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५’मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे ही भरती केली जाणार आहे. शासनाच्या धोरणानुसार संबंधित संस्थांमधील रिक्त पदे आणि आरक्षणाचा विचार करून ८० टक्के पदांवर नियुक्ती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी यापूर्वी २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवार परीक्षेला बसले होते. उमेदवारांना ६ ते ११ ऑगस्ट या कालावधीत पसंतीक्रम भरणे बंधनकारक आहे.
पसंतीक्रम भरण्यासाठी उमेदवारांनी https://tait2025.mahateacherrecruitment. या संकेतस्थळावर लॉगिन करावे. तेथे प्रथम प्राधान्यक्रम त्यानंतर पदनिहाय पसंतीक्रम नोंदवून तो ११ ऑगस्टपूर्वी निश्चित करणे आवश्यक आहे. पसंतीक्रम निश्चित न केल्यास पुढील निवड प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. यासाठी उमेदवारांना एसएमएसद्वारेही सूचना पाठविण्यात येत आहेत. पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुलाखतीशिवाय भरल्या जाणा-या पदांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेबाबत काही अडचण अथवा सूचना असल्यास उमेदवारांनी [email protected] या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
कोणत्या पदांचा समावेश?
भरतीसाठी जाहीर झालेल्या पदांमध्ये जिल्हा परिषदांच्या १३ हजार ३५१, महापालिकांच्या १ हजार ९५४, नगरपालिका व नगरपरिषदांच्या २८०, आदिवासी विकास विभागाच्या २ हजार ४२१, शासकीय विद्यालयांतील ५६ आणि खासगी शैक्षणिक संस्थांतील १२ हजार १४८ पदांचा समावेश आहे. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी सर्वाधिक १४ हजार ३२० पदे उपलब्ध असून, त्यानंतर सहावी ते आठवीसाठी १० हजार १२, नववी-दहावीसाठी ५ हजार ५१३ आणि अकरावी-बारावीसाठी ३६४ पदे भरली जाणार आहेत.
















