नवी मुंबई : प्रतिनिधी
युद्धजन्य परिस्थितीमुळे भडकलेल्या महागाईला मिरचीने तडका दिला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाळवलेल्या लाल मिरचीचे भाव किलोमागे शंभर ते तीनशे रुपयांनी वाढले आहेत.
कर्नाटक बेडगी, काश्मिरी मिरची २०० ते ३०० रुपये किलोमागे महागली असून, आंध्र प्रदेशातील तेजा जातीच्या मिरचीचे दर १०० ते १२० रुपयांनी वाढले आहेत. मुंबईकरांची तेजा, बेडगी आणि काश्मिरी जातीच्या मिरचीला अधिक मागणी आहे
. मुंबईत मार्च ते एप्रिल महिन्यात मसाले बनवण्यासाठी लगबगही सुरू झाली असल्याने, मिरचीच्या मागणीत घाऊक बाजारात वाढ झाली आहे. मागणीनुसार पुढे मिरचीचे दर वाढण्याची शक्यता आहे.
उन्हाळा सुरू झाला की अनेक महिला मसाला तयार करण्याच्या तयारीला लागतात. यावर्षी अगदी जानेवारीपासूनच लाल मिरचीचा ठसका वाढला होता. सुक्या मसाल्याच्या लाल मिरच्यांच्या दरात घाऊक बाजारातच यावर्षी मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कर्नाटकची बेडगी गेल्या वर्षी १५० ते २२५ रुपये किलो होती. ती यावर्षी ३८० ते ४२० रुपये किलोपर्यंत पोहोचली. कर्नाटक मिरचीची दुसरी जात काश्मिरी गेल्या वर्षी ४०० ते ५५० रुपये किलो होती. यंदाच्या हंगामात तिने चांगलाच ठसका दिला असून ६५० ते ८०० रुपये किलोपर्यंत मजल मारली आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील तेजा आणि तिख्खा गुंटूर जातीच्या मिरचीचे दर १०० ते १२० होते, तेजा २३० ते २५० आणि गुंटूर २६० रुपये किलोने एपीएमसी घाऊक बाजारात विकली जात आहे.
















