नवी दिल्ली : गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टाने समलैंगिक जोडप्यांना विवाहाचा अधिकार नाकारला होता. पण आता आपल्या याच निकालाच पुनर्विचार सुप्रीम कोर्ट करणार आहे. २८ नोव्हेंबर रोजी यावर सुनावणी पार पडणार आहे.
यासंदर्भात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल झाली आहे. यावर ही सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी याचिकाकर्त्याची बाजू मांडताना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर पुनर्विचार याचिकेवर सुनावणी होईल, अशी माहिती दिली. रोहतगी यांनी या पुनर्विचार याचिकेवर खुल्या न्यायालयात सुनावणी व्हावी यासाठी आपली बाजू लावून धरली. कोर्टाला म्हणाले की, समलैंगिक जोडप्यांना विवाहाचा हक्क नाकारणे हा भेदभाव असल्याचे सर्व न्यायाधीशांनी मान्य केले आहे. त्यामुळे यावर त्यांनी उपाय सुचवायला हवा असे आम्ही याचिकेत म्हटले आहे. हे प्रकरण २८ नोव्हेंबर रोजी सूचीबद्ध केले जाणार आहे.
कोर्टाने दिला होता नकार
समलैंगिक जोडप्यांना वैवाहिक समानतेचा अधिकार नाकारणा-या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणा-या विविध पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत. करुणा नुंडी आणि रुचिरा गोयल या वकिलांच्या माध्यमातून एक पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे ज्यात कोर्टाने १७ ऑक्टोबर रोजी दिलेल्या बहुमताच्या निकालाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली होती.
पूर्वीच्या याचिका फेटाळल्या
ज्यामध्ये विशेष विवाह कायदा, १९५४ (एसएमए), विदेशी विवाह कायदा १९६९ (एफएमए), नागरिकत्व कायदा १९५५, सामान्य कायदा आणि इतर विद्यमान कायदे, या कायद्यांनुसार, समलिंगी आणि समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी करणा-या याचिका फेटाळल्या होत्या.