मुंबई : मराठा आरक्षणाबाबत बोलताना ‘शिंदे-फडणवीस हे बनवाबनवी करणारे आणि लबाडीने बोलणारे नाहीत’असे मत संभाजी भिडे यांनी सरकारची बाजू घेत मांडले आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यभर गाजत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आठ दिवसांपासून उपोषण सुरू आहे.
दरम्यान, मागच्या वेळी जेव्हा जरांगे पाटलांचे उपोषण सुरू होते तेव्हा संभाजी भिडे त्यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटी येथे गेले होते. यावेळी मात्र त्यांनी सरकारच्या बाजूने प्रतिक्रिया दिली आहे. भिडे म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही दोन माणसे मला माहिती आहेत. राजकारणापलीकडे देशाचा विचार करून काम करणारे दोघे आहेत.
ते पुढे म्हणाले की, शिंदे-फडणवीस हे बनवाबनवी करणारे आणि लबाडीने बोलणारे नाहीत. ते कधीच स्वत:चा हातचा राखून चालत नाहीत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मिटेल, अशी बाजू संभाजी भिडेंनी मांडली आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी राज्य सरकारने बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.