नवी दिल्ली : ‘एक देश, एक निवडणुकी’च्या शक्यता तपासण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ‘एक देश, एक निवडणूक’ यासंदर्भात प्रितिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, देशभरात एकाचवेळी निवडणुका होणे हे राष्ट्रहिताचे आहे. त्याचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. संपूर्ण देशात एकाच वेळी निवडणुका घेणे देशासाठी फायदेशीर ठरेल. उर्वरित महसूल इतर विकासकामांमध्ये वापरता येईल. मी सर्व पक्षांना विनंती करतो की हा मुद्दा राष्ट्रीय हितासाठी आहे. या प्रकरणाचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही.
संसदीय समिती, निवडणूक आयोग, नीती आयोग आणि इतर समित्यांच्या भूमिकेबाबत बोलताना माजी राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, देशात ‘एक देश, एक निवडणूक’ पुनरुज्जीवन व्हावे, असे सर्व संस्थांचे मत आहे. केंद्राने या विषयासाठी समिती स्थापन केली आहे, असे ते म्हणाले. मला अध्यक्ष बनवण्यात आले आहे. आम्ही या विषयावर लोकांसोबत काम करत आहोत, त्यानंतर केंद्राला सूचना दिल्या जातील. वन नेशन-वन इलेक्शनची अंमलबजावणी कशी करायची यासाठी आम्ही सर्व राष्ट्रीय पक्षांकडून सूचना मागवल्या आहेत. या मुद्द्यावर सर्व पक्षांकडून सहकार्य अपेक्षित आहे, असे ते म्हणाले.