28 C
Latur
Wednesday, February 11, 2026
Homeसोलापूरसोलापूरचे महापौरपद खुला प्रवर्गासाठी आरक्षित

सोलापूरचे महापौरपद खुला प्रवर्गासाठी आरक्षित

विनायक कोंड्याल, अनंत जाधव, नरेंद्र काळे, सात्विक बडवे यांच्या नावाची चर्चा

सोलापूर : गुरुवारी दिनांक २२ जानेवारी मुंबईत झालेल्या सोडतीत सोलापूरचे महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण झाले. आता महापौर पदासाठी विनायक कोंड्याल, अनंत जाधव, नरेंद्र काळे, किरण देशमुख, प्रथमेश कोठे, सात्विक बडवे आदींच्या नावाची चर्चा होत आहे.

सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवल्यानंतर महापौर कोण होणार याकडे लक्ष लागून राहिले होते. गुरुवारी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत सोलापूरचे महापौर पद खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. दरम्यान महापौर पदासाठी विनायक कोंड्याल, अनंत जाधव, नरेंद्र काळे, किरण देशमुख, प्रथमेश कोठे या जुन्या जाणत्या नेत्यांसह पहिल्यांदाच नगरसेवक झालेल्या 27 वर्षीय सात्विक बडवे यांच्या नावाचीही चर्चा होत आहे.

विनायक कोंड्याल हे आतापर्यंत चार वेळा नगरसेवक झाले आहेत. यंदा तर तब्बल १४ हजाराचे मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत. भरिस भर आमदार देवेंद्र कोठे यांचे ते सख्खे मेव्हणे आहेत. प्रथमेश कोठे हे आमदार देवेंद्र कोठे यांचे सख्खे चुलत भाऊ आहेत. प्रथमेश कोठे यांनी जरी त्यांचे नाव महापौर पदाच्या स्पर्धेमध्ये नसले असे म्हटले आहे, तरी सूत्रांकडून त्यांचे नाव चर्चेत असल्याचा दावा केल्या जात आहे. अनंत जाधव, नरेंद्र काळे हे देखील अनेक वेळा नगरसेवक म्हणून विजयी झाले आहेत. पक्षाशी कायम एकनिष्ठ राहून पक्षाचे मुद्दे महापालिकेच्या सभागृहात हिरिरीने मांडत आले आहेत. नरेंद्र काळे यांना विरोधी पक्षनेता होण्याची संधीही मिळाली होती. यापूर्वी ते शहराध्यक्षही होते. प्रश्नांची जाण, मुद्देसूद मांडणी आणि आक्रमकता या त्यांच्या गुणांचा विचार महापौर करण्यासाठी होऊ शकतो.

सात्विक बडवे हे सोलापूर मधील समर्थ बँकेचे संचालक प्रशांत बडवे यांचे चिरंजीव आहेत. बडवे परिवार पन्नास वर्षापासून भाजपमध्ये कार्यरत, एकनिष्ठ आहे. अशी सर्व परिस्थिती पाहता धक्का तंत्र व तरुण नेता म्हणून सात्विक बडवे यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. अशातच आरक्षण खुला प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने अनंत जाधव हे मराठा व सात्विक बडवे हे ब्राह्मण समाजातील असल्यामुळे यंदा भाजप खुला प्रवर्गातील नगरसेवकाला संधी देणार का याकडे लक्ष लागले आहे.

यंदा महिलेस संधी नाही
महापालिकेत निवडून आलेल्या भाजपच्या ८७ नगरसेवकांमध्ये जवळपास ३० ते ३५ महिला नगरसेविका आहेत. मात्र वय, अनुभव व सक्षमता याबाबतीत एकीचाही प्रभाव पडत नसल्याने महापौर पदासाठी महिलेचा विचार होण्याची शक्यता नसल्याचे समजते आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR