Homeमहाराष्ट्र५ जुलैचा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द

५ जुलैचा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द

मराठी जनतेच्या रेटयामुळे सरकार नमले : राज ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी
पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयावर सरकारने माघार घेतल्याने ५ जुलै रोजी काढण्यात येणारा मोर्चा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, हिंदीची सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली, हा मराठी माणसाचा विजय असल्याचे सांगितले. हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे असे आम्ही गृहीत धरतोय आणि महाराष्ट्रातील जनतेने पण हेच गृहीत धरले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका, अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिले जाणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.

हिंदीबाबतचे दोन्ही जीआर रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्यानंतर, राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत आपली भूमिका जाहीर केली आहे. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होते आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे मात्र अजून गूढच आहे. पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हाणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचे अभिनंदन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल २०२५ पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेंव्हापासून हा मुद्दा तापायला लागला. त्यानंतर एक एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायच्या ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली. हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी. कदाचित या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल, पण हरकत नाही ही भीती असली पाहिजे असे राज ठाकरे म्हणाले.

अजून एक गोष्ट, सरकारने पुन्हा एकदा नवीन समिती नेमली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतोय समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे परंतू हे असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत ही गोष्ट सरकारने कायमची त्यांच्या मनात कोरून ठेवावी. हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे असे आम्ही गृहीत धरतोय आणि महाराष्ट्रातील जनतेने पण हेच गृहीत धरले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका, अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिले जाणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी असेही राज ठाकरे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR