चेन्नई: तामिळनाडूच्या राजकारणात एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या सी. जोसेफ विजय (थलपथी विजय) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच आपल्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या आश्वासनांची पूर्तता करण्यास सुरुवात केली आहे. सत्तेवर येताच पहिल्याच दिवशी विजय यांनी तीन मोठ्या फाईल्सवर स्वाक्षरी करून जनतेला मोठा दिलासा दिला आहे.
१. २०० युनिट मोफत वीज:
निवडणुकीपूर्वी दिलेले सर्वात मोठे आश्वासन पूर्ण करत, मुख्यमंत्री विजय यांनी राज्यातील घरगुती ग्राहकांसाठी २०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली आहे. यामुळे वाढत्या महागाईत सर्वसामान्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.
२. अमली पदार्थमुक्त राज्य (Special Task Force):
राज्यातील तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी एका विशेष कृती दलाची (Task Force) स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. अमली पदार्थांची तस्करी रोखणे आणि व्यसनमुक्त तामिळनाडू घडवणे हे त्यांच्या प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट असेल.
३. महिला सुरक्षा दल:
महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यभर विशेष सुरक्षा यंत्रणा आणि टास्क फोर्स तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘महिलांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता’ असल्याचे त्यांनी आपल्या पहिल्या भाषणात स्पष्ट केले.
“ही तर फक्त सुरुवात आहे…”
शपथविधीनंतर जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री विजय म्हणाले की, “मी दिलेली आश्वासने विसरलेलो नाही. ही केवळ सुरुवात आहे, अजून बरीच मोठी यादी बाकी आहे. मला थोडा वेळ द्या, मी प्रत्येक आश्वासन पूर्ण करेन.”
त्यांच्या जाहीरनाम्यात महिलांना दरमहा २५०० रुपये आर्थिक मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचे आश्वासन देण्यात आले आहे. या निर्णयामुळे तामिळनाडूतील ‘द्रविडीयन राजकारणा’ला मोठा धक्का बसल्याचे मानले जात असून, विजय यांच्या ‘टीव्हीके’ (TVK) पक्षाने पहिल्याच दिवशी आपली धमक दाखवून दिली आहे.

