छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपूर्वी देशाला हादरवून टाकलेल्या दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील बॉम्बस्फोटादरम्यान शहरातील तोतया आयएएस महिला अधिकारी कल्पना भागवत हिचेदेखील दिल्लीत वास्तव्य असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच दरम्यान, तिच्या मोबाइलमध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया व बांग्लादेशच्या व्यक्तींच्या नावे क्रमांक सेव्ह असल्याचे नव्याने समोर आले. केंद्रीय तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्याचे केंद्रीय गुप्तचर खात्यातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
रविवारपासून पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कल्पनाची सध्या सिडको पोलिसांसह गुप्तचर यंत्रणा, एटीएसकडून कसून चौकशी सुरू आहे. बुधवारी तिच्या पोलिस कोठडीत १० दिवसांची वाढ झाली. पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत तिची कसून चौकशी केली. एटीएस, गुप्तचर यंत्रणांनी दोन तास चौकशी केली. सायंकाळी पुन्हा सर्वांनी एकत्रित चौकशी करीत तिला बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माझ्या खूप ओळखी आहेत, अनेक देशांत माझ्या परिचयाची माणसे, अधिकारी आहेत, असे ती सांगते. तपास यंत्रणांनी आता तिच्या प्रत्येक उत्तराची खातरजमा करणे सुरू केले आहे. पोलिस निरीक्षक अतुल येरमे, सहायक निरीक्षक योगेश गायकवाड अधिक तपास करत आहेत.
तोतया अधिका-यांचे सिंडिकेट?
कल्पनाच्या मोबाइलमध्ये अनेक मोबाइल क्रमांकांसोबत केंद्रीय गृहमंत्र्यांचे ओएसडी म्हणून अभिषेक चौधरी नावाने नंबर सेव्ह आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्याची माहिती काढली जात होती. दिल्लीकडून प्राप्त माहितीनुसार, सदर व्यक्तीने मंत्र्यांच्या ओएसडीच्या नावाचा वापर करून त्यानेही अधिकारी असल्याचा बनाव रचल्याचा अंदाज आहे. त्यामुळे कल्पना व अशा अनेक तोतया अधिका-यांचे सिंडिकेटच ऑपरेट होत असल्याचा कयास आहे. कल्पनाच्या दाव्यानुसार, त्याची आणि तिची दिल्लीत वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. तो उत्तर भारतीय असल्याचे समोर आले.
सौदी अरेबिया, बांगलादेशचेही संपर्क क्रमांक
कल्पनाच्या मोबाइलमध्ये बुधवारी पाकिस्तानच्या अफगाण अॅम्बॅसी, पेशावर कँटॉन्मेंट बोर्ड, झरदारी सर वाइफ, अफगाणिस्तान अॅम्बॅसी, मुजीबभाई, झरदारी सर, मोहम्मद रजा व नक्वी असे ११ क्रमांक आढळल्याने तपास यंत्रणा हादरून गेल्या. मात्र, आता तिच्या मोबाइलमध्ये सौदी अरेबिया, बांग्लादेशच्याही अनेकांच्या नावाने क्रमांक असल्याचे गुरुवारी समोर आले. त्याविषयीही कल्पना गोलमाल उत्तर देते.
२०२१ मध्ये विद्यापीठातून बडतर्फ
बी. एस्सी. पदवीधर कल्पनाने महाविद्यालयीन काळात एमपीएससी, यूपीएससी परीक्षेची तयारी केली होती. एकदा तिने यूपीएससीची पूर्वपरीक्षादेखील दिली व उत्तीर्ण केली होती. त्याच दरम्यान तिने एम. एस्सी.ला प्रवेश घेऊन ते अर्धवट सोडले. त्यानंतर २०१३मध्ये विद्यापीठाच्या भरतीमध्ये ती लिपिक म्हणून रुजू झाली. मात्र, अचानक गैरहजर राहिली. २०२१मध्ये तिला विद्यापीठ प्रशासनाने बडतर्फ केले. त्यानंतर तिने स्वत:ला आयएएस अधिकारी म्हणून मिरवण्यास सुरुवात केली. त्यानंतर अनेकदा दिल्लीत जाऊन तिने महाराष्ट्र सदनमध्ये मुक्काम ठोकला. तेथे ती अनेकांच्या भेटी घेत होती. याच छबीचा आधार घेत ती शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या संपर्कात आल्याचेही पोलिस तपासात समोर आले.
















