छत्रपती संभाजीनगर : पार्थ पवारांच्या प्रकरणात चौकशी होत आहे हीच मोठी गोष्ट आहे. जसे पार्थ पवार नाही तसे शितल तेजवाणी पण नाही असे अजून म्हणायची वेळ आलेली नाही, पण लवकरच ती वेळ येईल. त्यामुळे चौकशी झाली हेच फार मोठे भाग्य आहे असे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
अंबादास दानवे म्हणाले की, पार्थ पवार हे ९९ टक्के भागीदार आहे त्यांना वाचवले जात आहे. सत्ता आहे तो पर्यंत हे सर्व चालेल नंतर कधी कुणाला उचलणार हे कळणार सुद्धा नाही, असा इशाराही दानवेंनी दिला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अनेक ठिकाणी एकत्र लढत आहे. एखाद्या ठिकाणी एकत्र नसेल पण महायुतीला बाजूला करायचे असेल तर एकत्र लढणे गरजेचे आहे, नाही तर त्यांची मस्ती सहन करावी असे दानवेंनी म्हटले आहे.
बिनविरोध नगराध्यक्ष काही मोठे नाही
अंबादास दानवे म्हणाले की, राजकीय नेत्यांचे नातेवाईक बिनविरोध निवडून आले हे काही जनतेच्या मनातील विजय नाहीत. हे सत्ता आणि संपत्ती आणि धाक दाखवून मिळवलेले विजय आहेत. अनगरमध्ये जिथे राजन पाटलांची सून निवडून आली तिथे दुस-या महिला उमेदवाराला अर्ज भरण्यासाठी पोलिस संरक्षण घ्यावे लागते हेच लोकशाही तडफडत असल्याचे उदाहरण आहे. नगराध्यक्ष बिनविरोध निवडून येणे म्हणजे काही मोठा तीर मारणे आहे असे मी समजत नाही, थोडासा विरोध असलाच पाहिजे. अर्ज दाखल केलेल्यांना त्रास देत निवडणूक बिनविरोध करण्यात येत आहे हा सर्व यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे.
सत्य परेशान हो सकता है, हार नही सकता
अंबादास दानवे म्हणाले की, सलील देशमुख यांच्या अजित पवार गटात प्रदेशाबद्दल मला काही माहिती नाही. पण अनिल देशमुख हे शरद पवार यांच्यासोबत निष्ठेने राहणारे नेते आहेत. त्यांनी काही गुन्हा नसताना कारागृहात जाणे पसंद केले. ईडीने त्यांच्या नातवाची देखील चौकशी केली होती. त्यांच्याशी संगनमत असणा-या सोबत सलील देशमुख यांनी जाणे चुकीचे ठरले पण आताचा घडीला तत्व विचार यांना काही महत्त्व देत नाही. सत्य परेशान हो सकता है, हार नही सकता पण त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. सत्ता हे कधी सर्वस्व नसते हा विचार लक्षात ठेवला पाहिजे. सत्ता हे एक लालच आहे. सत्ता नसताना अनेकांनी लढा दिला आहे.
..तर मस्ती जिरवली पाहिजे
अंबादास दानवे म्हणाले की, मराठी माणसाने एवढे कच्चे राहू नये, जशाच्या तसे उत्तर देण्याची आपली भूमिका असली पाहिजे. भाषेवर जर इतकी मस्ती असेल तर ती सुद्धा जिरवली पाहिजे असे कल्याण-मुलुंड लोकल प्रवासामध्ये झालेल्या कथित भाषिक वाद, मारहाण आणि त्यातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे १९ वर्षीय अर्णव खैरेने आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली त्यावर बोलताना दानवेंनी असे म्हटले आहे.
..तर गजब झाला असता
अंबादास दानवे म्हणाले की, उर्दू भाषेला विरोध करण्याचा आमचा मानस नाही. भाजपने जे उर्दू बॅनर केले आहे ते जर आम्ही केले असते तर किती गजब झाला असता. भाजपने केलेले उर्दू चालते पण शिवसेना आणि काँग्रेसने केले असते तर तुम्हाला चालले नसते. मतांसाठी तुम्ही हे सर्व करत आहात. उर्दू कोणाची भाषा आहे, उर्दू भाषा चांगली आहे.
















