22.3 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्रझेंडूच्या फुलांचा दर वाढला 

झेंडूच्या फुलांचा दर वाढला 

नाशिक : आज लक्ष्मीपूजन असल्याने झेंडूच्या फुलांना सर्वाधिक मागणी असून बाजारात मात्र फुलांचा भाव चांगलाच वाढल्याचे चित्र आहे. आज झेंडूच्या फुलांचा दर १०० रुपये शेकडा आहे. तर झेंडू फुलांच्या कॅरेटचा दर ४०० रुपये असून फुलांच्या माळा साधारण ६० रुपयांपासून ते दोनशे रुपयांपर्यंत विक्री केल्या जात आहेत. त्यामुळे दस-यापेक्षा दिवाळीत फुलांचे दर वाढल्याचे चित्र आहे.

दिवाळीच्या सणाला झेंडूच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असते. दिवाळीत घर सजावटीसाठी, वाहनांसाठी फुलांची खरेदी केली जाते. त्याचबरोबर आजच्या म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झेंडूच्या फुलांचे दाराला तोरण लावले जाते. शिवाय, वाहन व दुकानांना फुलांच्या माळा लावल्या जातात. त्यामुळे दिवाळीच्या इतर खरेदीसह बाजार फुलांनी बहरला आहे. फुलांच्या खरेदीसाठी नाशिककर बाहेर पडले असून ग्राहकांच्या सोयीसाठी फुलेविक्रेत्यांनी रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटली आहेत. दस-याच्या दिवशी फुलांचे दर घसरले होते. वीस ते तीस रुपयांना फुलांच्या माळा मिळत होत्या. मात्र दिवाळीत फुलांचे भाव वाढले असून झेंडूची फुले १०० रु. शेकडा दराने विकली जात आहेत. तर फुलांच्या माळा ६० रुपयांपासून पुढे विकल्या जात आहेत.

दरम्यान ग्रामीण भागापेक्षा नाशिक शहरात झेंडूची फुले मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात असल्याने शेतक-यांनी आदल्या दिवशी फुले विक्रीस आणली होती. लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत आणि रविवारी कारंजा परिसरात ग्राहक झेंडूची फुले, पुष्पहार खरेदी करताना दिसून आले. सर्वाधिक मागणी झेंडू फुलांच्या माळांना असल्याने विक्रेत्यांनी फुलांच्या माळा मोठ्या प्रमाणावर तयार करून ठेवल्या होत्या. पुष्पहार ६० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत विकले जात होते. दस-याला झेंडूच्या फुलांचा भाव हा ५० ते ६० रुपयांदरम्यान होता. मात्र दिवाळीत भाव वाढल्याचे पाहायला मिळाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR