29.4 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeराष्ट्रीयहिंदी महासागराच्या तापमानात होतेय वेगाने वाढ!

हिंदी महासागराच्या तापमानात होतेय वेगाने वाढ!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ग्लोबल वॉर्मिंगबद्दल आपण नेहमी ऐकत वा वाचत असतो. आता जगातील टॉप संस्थांनी केलेले एक संशोधन समोर आले आहे. या संशोधनानुसार हिंदी महासागराचे तापमान हे जगातील इतर महासागरांपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. याचा फटका भविष्यात अरबी समुद्राला आणि पर्यायाने भारतालाही बसणार असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी, ऑस्ट्रेलियातील सीएसआयआरओ, अमेरिकेतील प्रिंसेटन युनिव्हर्सिटी, फ्रान्समधील सॉर्बोने विद्यापीठ आणि स्वीत्झर्लंडमधील बर्न विद्यापीठ या सर्वांनी मिळून हा रिसर्च केला आहे. वाढत्या कार्बन उत्सर्जनामुळे महासागरांचे तापमान वाढत आहे. यासोबतच ध्रुवांवरील बर्फ वितळून महासागरातील पाणीदेखील वाढत आहे. यामुळे भविष्यात आणखी विचित्र हवामान दिसू शकते, असेही या रिसर्चमध्ये म्हटले आहे.

या रिसर्चसाठी गेल्या कित्येक दशकांपासून महासागरांच्या तापमानात कशी वाढ झाली, हे तपासण्यात आले आहे. १९५० ते २०२० या काळात महासागरांचे तापमान हे दर शतकाला १.२ डिग्री सेल्सिअस एवढे वाढत आहे. मात्र, २१०० या वर्षापर्यंत हा दर ३.८ डिग्री सेल्सिअस एवढ्या वेगाने वाढेल, अशी भीती डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी व्यक्त केली. आयआयटीएमच्या रिसर्चचे नेतृत्त्व त्यांनी केले आहे. यासोबतच हिंदी महासागराचे २,००० मीटर खोलीवरील तापमान हे दर दशकाला सुमारे ४.५ झेटा-ज्यूल या वेगाने वाढत आहे. येत्या काही शतकांमध्ये हे प्रमाण वाढून तब्बल १६-२२ झेटा-ज्यूल प्रतिदशक होईल, असे म्हटले जात आहे. झेटा-ज्यूल हे एनर्जीचे मोठे एकक आहे. सुमारे २३९ बिलियन टन टीएनटीचा विस्फोट झाल्यानंतर जेवढी एनर्जी तयार होईल, त्याला एक झेटा-ज्यूल समजले जाते.

पृथ्वीवरील सजीवांवर सर्वाधिक दुष्परिणाम
या सगळ््याचा मोठा दुष्परिणाम पृथ्वीवरील सजीवांवर होणार आहे. पाण्याची पातळी वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात भूभाग पाण्याखाली जाऊ शकतो. तसेच समुद्राचे तापमान वाढल्यामुळे आतील जैवविविधतादेखील नष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. केवळ माशांनाच नाही तर प्रवाळाच्या विविध प्रजातींनाही याचा फटका बसत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR