जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुनच रचण्यात आल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. यामुळे सबंध राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गेवराई येथून जालना पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
गेवराई तालुक्यातील धानोरा येथील अमोल खुणे यांचा या अटकेत समावेश आहे. याबाबत अमोल खुणेच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे, माझ्या नव-याला महिन्याभरापासून दारु पाजून मनोज जरांगे यांच्या विरुद्ध षडयंत्र रचायला लावल्याची माहिती पत्नीने दिली आहे.
मागील एक महिन्यापासून माझ्या पतीला दारु पाजत होते. त्या नशेमध्ये त्यांच्याकडून हे सगळं करून घेतलं जात होते. मात्र माझे पती मराठा आंदोलक जरांगे पाटलांचे सुरुवातीपासून कार्यकर्ते आहेत. त्यांच्या मोबाईलमध्ये व स्टेटसला नेहमी जरांगे पाटलांचे फोटो असतात. ते जरांगे पाटलांना देव मानतात. माझ्या पतीला या प्रकरणात अडकवले जात आहे.
त्यांचा काहीही संबंध नाही, असा धक्कादायक दावा आरोपी अमोल खुणे याची पत्नी आणि आईने केला आहे. त्यामुळे या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाला आहे. माझ्या मुलाचा या प्रकरणात काहीही संबंध नाही असे म्हणत अमोल खुणेच्या आईला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
















