सोलापूर : सोलापुरात प्रेम प्रकरणाचा अजब प्रकार घडला असून प्रियकर साथ सोडून दुस-या तरुणीशी लग्न करत असल्यामुळे तृतीयपंथीयाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दि. ४ डिसेंबर रोजी येथे घडली.
प्रकाश व्यंकटप्पा कोळी, वय २२, रा. साईनगर, बाळे सोलापूर असे मृताचे नाव आहे. त्याने राहत्या घरात लोखंडी पत्राच्या अँगलला गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला तत्काळ छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर तृतीयपंथी समाजातील अनेक जण रुग्णालयात जमले होते. दरम्यान मृताची बहीण ज्योती कोळी हिने प्रकाश हा गेल्या काही महिन्यांपासून एका युवकाच्या प्रेमसंबंधात होता.
अचानक संबंधित प्रियकराने लग्नाच्या निर्णय घेतल्याने प्रकाश मानसिक तणावात गेला होता. प्रकाशने आत्महत्येपूर्वी व्हीडीओ काढून प्रेमभंगाने आत्महत्या करत असल्याचे म्हटल्याचे सांगितले. प्रियकराने प्रकाशबरोबर संबंधात असताना त्याच्याकडून प्रेमाचे नाटक करून मोठ्या प्रमाणात पैसे दागिने काढून घेतले. तो आधी राहत असलेल्या धोतरे वस्तीतून त्याला काढून घेऊन बाळयाला नेले होते. तेथे मारहाण करण्यात येत होती. भावा-बहिणीला भेटू देत नव्हता. माझा भाऊ जोगतीण होता, त्याला न्याय मिळाला पाहिजे, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असेही ज्योती कोळी यांनी सांगितले.

