24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रविखे-कोल्हे संघर्ष विकोपाला जाणार?

विखे-कोल्हे संघर्ष विकोपाला जाणार?

अहमदनगर : प्रतिनिधी
विखे-पाटील आणि कोल्हे घराणे प्रस्थापित आहेत. दोन्ही घराण्याचा आपापल्या भागात चांगला प्रभाव आहे. मात्र, याच दोन घराण्यात अलिकडे चांगलाच संघर्ष वाढला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्ह्यात आपल्या हाती सूत्रे कायम करण्याच्या प्रयत्नांत आहेत. मात्र, त्यांना पक्षांतर्गत विरोध प्रचंड आहे. त्यातच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा विखेंमुळेच पराभव झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे आक्रमक झाले असून, विखेंविरोधात त्यांनी दंड थोपटले आहेत. या अगोदर गणेश साखर कारखाना आणि आता ग्रामपंचायत निवडणुकीत कोल्हेंनी बाजी मारली. त्यामुळे भविष्यात हा संघर्ष विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

विवेक कोल्हे यांच्या आई स्नेहलता कोल्हे या भाजपच्या माजी आमदार आहेत आणि विखे पाटीलही भाजपचेच ज्येष्ठ नेते आहेत. मात्र, स्थानिक राजकारणात यांच्यात अजिबात सख्य नाही. उलट २०१९ मध्ये विखेंमुळेच स्नेहलता कोल्हे यांचा पराभव झाल्याचा विवेक कोल्हे यांचा आरोप आहे. यावरून कोल्हे घराण्यातील तिस-या पिढीचे प्रतिनिधी विवेक कोल्हे हा युवा नेता आक्रमक झाला असून, प्रत्येक निवडणुकीत त्यांनी विखेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या अगोदर गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने विखेंविरोधात सर्वपक्षीय पॅनल तयार करून विखेंना चित केले. त्यानंतर आता नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विवेक कोल्हे यांना चांगले यश मिळाले. त्यामुळे भविष्यात विखे आणि कोल्हे घराण्यातील संघर्ष विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर विवेक कोल्हे राधाकृष्ण विखेंविरोधात दंड थोपटणार का, अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. ते दुस-या पक्षात जाणार का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. यावर बोलताना विवेक कोल्हे यांनी या सर्व चर्चा निरर्थक आहेत. आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली भाजपमध्ये काम करतो. सध्या आमचे पक्ष बळकट करण्याचे काम सुरू आहे, असे सांगून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आई स्नेहलता कोल्हे यांचा पराभव विखेंमुळेच झाला, हे सांगायला विसरले नाहीत. या अगोदरही त्यांनी विखेंवर हाच आरोप केला होता.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे कोण कुणाविरुद्ध लढणार, याबाबत जिल्ह्यात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. त्यातच अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे थेट विखेंच्या विरोधात दंड थोपटण्याचीही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, विवेक कोल्हे यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना या केवळ चर्चा असल्याचे म्हटले.

चर्चा निरर्थक : विवेक कोल्हे
विखे यांच्या मतदारसंघात निवडणूक लढवण्याचे सध्या मनात नाही, या सर्व निरर्थक चर्चा असून आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो, असे सांगितले. विधानसभा निवडणुकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेव्हणे उभे राहिल्याने माजी आमदार स्रेहलता कोल्हे यांचा पराभव झाल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे विवेक कोल्हे यांचा हा राग कायम आहे. त्यामुळे येणा-या काळात राजकीय समीकरणे बदलू शकतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR