नवी दिल्ली : शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल ज्या पद्धतीने अमित शहा यांनी हे निर्घृण, क्रूर, अमानुष राजकारण केले त्याच्यामुळे त्यांना माफी नाही. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता येतील त्या दिवशी भाजप आणि अमित शहांना कळेल की पक्ष कसे फुटतात. हातामध्ये सत्ता असल्यावर पक्ष कसे फुटतात हे त्यांच्यापेक्षा निर्घृण पद्धतीने आम्ही दाखवू शकतो, असे आमचे ठरले आहे. दया माया नाही. ज्या दिवशी सत्ता जाईल त्या दिवशी ८० टक्के भाजप आपोआप खाली होईल. सत्ता काय करू शकते, सत्तेची पोलादी पकड काय असते हे तेव्हा कळेल. काहीही न करता भाजप माचीसचा रिकामा बॉक्स असतो तशी रिकामी होईल, असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी दिल्लीत माध्यमांशी बोलताना केला.
अमित शाह किंवा नरेंद्र मोदी यांनी शरदद पवार यांचा पक्ष फोडला आणि आमचाही पक्ष फोडला. त्यामुळे आम्ही त्यांना भेटणार नाही. आमचा आणि त्यांचा वाद कायम राहील. त्यांनी नुसता पक्ष फोडला नाही तर आमचा पक्षच ऐ-यागै-याच्या हातात दिला. मी हा शब्द मुद्दाम वापरतो, कारण त्यांचा शिवसेनेशी काही संबंध नाही, असे संजय राऊत म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ आमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की दिल्लीत अधिवेशन सुरू असताना खासदारांनी त्यांच्या मतदारसंघातील प्रश्नांसाठी पंतप्रधानांना किंवा गृहमंत्र्यांना भेटणे याच्यामध्ये आश्चर्य वाटावे असे काय आहे. पंतप्रधानांना एकत्र जाऊन यासाठीच भेटावे लागतेय की ते संसदेमध्ये भेटण्यासाठी येत नाहीत. राष्ट्रवादीचे ८ खासदार काय लपूनछपून भेटत नाहीत. रीतसर त्यांनी पंतप्रधानांची वेळ घेतलेली आहे आणि सुप्रिया सुळे त्यांचे नेतृत्व करत आहेत. माझी या विषयावर त्यांच्याशी चर्चाही झाली. एकेकाने भेटल्यावर संशय येतो म्हणून एकत्र जाऊ, एकत्र प्रश्न मांडू ही त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भूमिका आहे.
दरम्यान, या भेटीवेळी डिलिमिटेशन बीलासंदर्भात असल्याची चर्चा होण्याची शक्यता असल्याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मला वाटत नाही की शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणत्याही परिस्थितीत इंडिया आघाडीच्या विरोधात जाऊन भूमिका घेईल किंवा एनडीएला मदत करण्याची भूमिका घेईल. शरद पवार आणि सुप्रिया सुळे डिलिमिटेशन बीलला पाठिंबा देतील असे मला वाटत नाही. ज्या पद्धतीने हे बील येत आहे, ८५० खासदार बनवून हवे तसे मतदारसंघाची तोडफोड करायची हे राष्ट्रहिताच्या दृष्टीने योग्य नाही.
आमची लढाई चालूच राहणार
आमचा स्वाभिमान जरा वेगळ्या प्रकारचा आहे. आम्ही त्यांचे तोंड पण बघत नाही. शरद पवारही स्वाभिमानी आहेत, पण त्यांचे राजकारण सर्व समावेशक आहे. आमचे तसेच नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका त्यांच्या असतात, पण आम्हाला आमचा पक्ष महत्त्वाचा आहे. ज्या पद्धतीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असंवैधानिक पद्धतीने आमचा पक्ष फोडला, त्या गटाला मान्यता द्यायचा प्रयत्न केला, आमचे चिन्ह, पक्ष ऐ-यागै-याच्या हातात दिला. त्यामुळे आमची लढाई चालूच राहणार आहे, असेही संजय राऊत ठामपणे म्हणाले.
















